देवा, शिवसेनेला सुबुद्धी दे !

प्रकाश पाटील
शनिवार, 28 जानेवारी 2017

प्रत्येक ठिकाणी देवच कशाला लागतो ? सरकारी अधिकाऱ्यांना इतकी कसली भीती वाटते की देव सतत जवळ असावेत असे त्यांना वाटते. शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता फडणवीस सरकारने कार्यालयातील देवांचे फोटो काढण्याचे आदेश दिले पाहिजेत. ऑफिसमध्ये फोटो लावणारा प्रत्येक माणूस जर आपणास मत देईल अशी आशा शिवसेना बाळगून असेल तर हा वेडेपणा आहे.

प्रत्येक ठिकाणी देवच कशाला लागतो ? सरकारी अधिकाऱ्यांना इतकी कसली भीती वाटते की देव सतत जवळ असावेत असे त्यांना वाटते. शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता फडणवीस सरकारने कार्यालयातील देवांचे फोटो काढण्याचे आदेश दिले पाहिजेत. ऑफिसमध्ये फोटो लावणारा प्रत्येक माणूस जर आपणास मत देईल अशी आशा शिवसेना बाळगून असेल तर हा वेडेपणा आहे.

एक घटना आठवते. झाले असतील सात-आठ वर्षे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णा नायकवडी हे शेतकरी प्रश्‍नावर सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरिता गेले होते. चर्चेला सुरवात होण्यापूर्वी अण्णा त्या जिल्ह्याधिकाऱ्यावर संतापले. या कार्यालयात हे देवादिकांचे फोटो कशासाठी ? देवधर्म घरात पाळा असे स्पष्टपणे सल्ला देतानाच त्यांनी खंतही व्यक्त केली होती. त्यावेळी जिल्ह्याधिकाऱ्याची तत..फफ.. झाली होती. स्वातंत्र्यासाठी अण्णांनी मोठे योगदान दिले होते. त्यामुळे ते एखादी गोष्ट मंत्री आणि अधिकाऱ्यांनाही अधिकारवाणीने सांगत असत. पुढे काही महिन्यात त्या जिल्हाधिकाऱ्यांची बदलीही झाली. एक जिल्हाधिकारी गेला आणि दुसरा आला. त्यानेही आपले देव त्या दालनात बसविले. असे चित्र जिल्हाधिकारीच काय सर्वच शासकीय कार्यालयात दिसून येते. जो ज्या देवाचा, बाबा-बुआंचा त्यांचे फोटो तो टेबलावरील काचेखाली (त्याच टेबलाखालून चिरीमिरीही घेतली जाते) किंवा जेथे तो बसतो त्याच्या नेमके मागे तरी फोटो असते. आपल्याकडे देवदेवतांचा रस्त्यावर आणि शासकीय कार्यालयात जो बाजार मांडला जातो आहे त्याला कोणीच पायबंद घालू शकले नव्हते ते या सरकारने करून दाखविले होते. पण दुर्दैवाने हा निर्णयही मागे घ्यावा लागला.

सरकारी कार्यालयात देवदेवतांचे फोटो यापुढे लावता येणार नाही हा राज्य सरकारने घेतलेला आदेश मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्याची माहिती उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे. वास्तविक या स्वागतार्ह निर्णयाचे शिवसेनेने स्वागत करायला हवे होते. पण, युती तुटल्यानंतर फडणवीस सरकारवर स्वत: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकेचे प्रहार केले. देवदेवांचा प्रश्‍न उपस्थित करून हिंदुत्वाचे राजकारण सुरू केले. राजकारणात आता कोणता मुद्दा हायलाईट होईल हे काही सांगता येत नाही. शासकीय कार्यालयात काय केवळ हिंदूंचेच फोटो असतात का ? की सगळे अधिकारी हिंदूच असतात? याचा साधा विचारही केला नाही. शिवसेनेने इतक्‍या घाईगर्दीत चांगल्या निर्णयाला विरोध करायचे काहीच कारण नव्हते. केवळ हिंदुत्वाचे राजकारण करून मते पदरात पाडून घेण्यासाठी ते उतावीळ झाले आहेत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक जाती, धर्माचे लोक शासकीय नोकरीत असतात. जो ज्या धर्माचा किंवा पंथाचा असतो तो माणूस (नास्तिक सोडून ) आपल्या श्रद्धास्थानाना टेबलावर मांडत असतो. अशी श्रद्धा ठेवण्यास कोणाचीच हरकत नाही. मात्र, ही श्रद्धास्थाने स्वत:च्या हृदयात किंवा घरात पुजली जावी. सरकारी कार्यालयात जागा अडविण्याचे काम ही मंडळी का करीत आहेत हे कळत नाही ? ज्या पदावर माणूस काम करतो त्या पदावर असलेली व्यक्ती कोणत्या धर्माची किंवा जातीची आहे हे काम घेऊन येणाऱ्यांच्या लक्षात येते. हे लक्षात आणून देण्याची गरजही नाही.

सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी ज्या ठिकाणी बसतात किंवा जे ऑफीस असते ते त्याच्या मालकीचे नसते तर सरकारचे असते. त्यामुळे अशा कार्यालयात देवादिकांना जागा देण्याचा अधिकार यांना दिला कोणी ? लोकशाहीने प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र दिले आहे. त्याने आपला धर्म चार भिंतीच्या आत जपला पाहिजे. मग ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध असो की अन्य कोणत्याही जाती धर्माचा. सुटी असेल किंवा घरी असाल तेव्हा जा ना मंदिरात. जपतप करीत तासोनतास बसा कोणी अडविले आहे ? सरकारी कार्यालये ही काही देव पुजण्याची जागा नाही हे मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे येत नाही. कार्यालयात आज बहुसंख्य हिंदू आहेत म्हणून देव आले. उद्या इतर धर्माचे देव येतील सर्वांना जागाच पुरणार नाही.

सरकारने याबाबत खूप चांगला निर्णय घेतला होता. लोकांना तो मान्यही झाला होता. पण भावनेचे आणि धर्माचे राजकारण करून शिवसेनेने हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले आहे. मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मतांवर डोळा ठेवून या निर्णयाला विरोध केला आहे. तो चुकीचा आहे. जर तुमच्या मालकीची म्हणजेच खासगी कार्यालये असतील तर तेथे अशाप्रकारचे देव आणि बाबा-बुआ पुजण्यात कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. पण जर सरकारी कार्यालये असतील तर तेथे स्वत:चे देव आणायचे कशाला ? ठेवाना ते घरी. नागनाथअण्णांना नेमके काय म्हणायचे होते हे प्रत्येकाने लक्षात घेण्याची गरज आहे. प्रत्येकठिकाणी देवच कशाला लागतो ? सरकारी अधिकाऱ्यांना इतकी कसली भीती वाटते की देव सतत जवळ असावेत असे वाटते. शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता फडणवीस सरकारने या निर्णयाची काटेकोरपणे अंलबजावणी करायला हवी. गेल्या साठ वर्षातील हा छोटा असला तरी मोठा क्रांतिकारक निर्णय आहे असे म्हणावे लागेल. शिवसेनेने भावनेशी खेळून मताचा जोगवा मागू नये. ऑफिसमध्ये फोटो लावणारा प्रत्येक माणूस जर आपल्या पक्षाला मत देईल अशी आशा शिवसेना बाळगून असेल तर हा वेडेपणा आहे. देवा, आताच तूच शिवसेनेला सुबुद्धी दे !

Web Title: prakash pati's shivsena blog