प्रणिती शिंदे म्हणाल्या, कोरोनापेक्षा क्वारंटाईनची अधिक भीती, महेश कोठे म्हणाले, चाचणीचे रिपोर्ट व्यवस्थित द्या 

प्रमोद बोडके
Friday, 10 July 2020

पालकमंत्र्यांनी बोलविले म्हणून आलो 
महापालिकेतील काही अधिकारी माझ्यात व महापालिका आयुक्तांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. कोरोनाबाधित व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्याचे काम आम्ही करतो. मी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला दम दिल्याची खोटी माहिती महापालिका आयुक्तांना एका अधिकाऱ्याने सांगितली. महापालिका आयुक्तांनी लगेच त्या अधिकाऱ्याच्या माहितीवर विश्‍वास ठेवला. महापालिका प्रशासनात ताळमेळ नाही. पालकमंत्री भरणे यांनी बैठक बोलविली म्हणून आम्ही आज उपस्थित राहिलो अन्यथा आम्ही या बैठकीला उपस्थित राहिलो नसतो. 
- आनंद चंदनशिवे, नगरसेवक, सोलापूर 

सोलापूर : सोलापूर शहरातील नागरिकांना आता कोरोनापेक्षा क्वारंटाईनचीच भीती अधिक वाटू लागली आहे. क्वारंटाईन करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करा. सोलापुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा दहा टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. सोलापुरातील मृत्यूदर तीन ते पाच टक्‍यांवर आणा अशी सूचना सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्या आहेत. सोलापुरात लॉकडाऊन घेण्याबाबत आज सातरस्ता येथील नियोजन भवनात पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत आमदार शिंदे यांनी हे मुद्दे उपस्थित केले आहेत. 

आमदार शिंदे म्हणाल्या, हॉंगकॉंगमध्ये अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. त्यामुळे आपल्याकडील कोरोनाचा प्रादुर्भाव इतक्‍यात कमी होईल असे नाही. साधरणत: एक ते दोन वर्षे हा प्रादुर्भाव कायम राहण्याची शक्‍यता आहे. येत्या काळात नागरिकांना कायमस्वरूपी मास्कचा वापर करावा लागणार आहे. सॅनीटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सचे पालन करावे लागेल. आपल्याकडील नागरिकांची याबाबत मानसिकता करण्यासाठीही प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.

महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे म्हणाले, कोरोना चाचणीचे काही रिपोर्ट निगेटिव्ह येतात व लगेच पॉझिटिव्हही येतात. त्यामुळे संभ्रम आहे. कोरोना चाचणीचे रिपोर्ट बरोबर देण्याची आवश्‍यकता आहे. विडी कामगार, यंत्रमाग व गारमेंटचे कामगार यांच्यासह इतर कामगारांना लॉकडाऊन कालावधीत घरात राहून रोजगार देता येईल का? याबाबतही विचार करावा अशी मागणी महापालिका विरोधी पक्षनेते कोठे यांनी केली. महापालिका सभागृह नेते श्रीनिवास करली यांनीही यावेळी विविध मुद्दे उपस्थित केले. महापौर श्रीकांचन यन्नम यांनी महापालिकेच्या निधीचा मुद्दा उपस्थित केला. पोलिस प्रशासन सहकार्य करत नसल्याची तक्रारही त्यांनी पालकमंत्री भरणे यांच्यासमोर केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praniti Shinde says more fear of quarantine than corona, Mahesh Kothe said, give proper test report