विरोधकांची झोप उडवणारे भाजपचे प्रचारअस्त्र

प्रशांत बारसिंग
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

यावर असेल प्रचारात भर...
    केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा प्रचार.
    तोंडी तलाक, ३७० कलम रद्द करणे.
    राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीलादेखील भारतीय जनता पक्षाची तयारी जोरात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी साधनांचा वापर करण्यात येतो आहे. प्रत्यक्ष निवडणूक काळात त्याचा अधिकाधिक प्रभावी वापरावर भर राहणार आहे...

स्वातंत्र्यानंतर देशप्रेमाने भारलेल्यांनी लोकांचे प्रतिनिधित्व करत प्रतिनिधीगृहांमध्ये प्रवेश केला. मूल्ये, विचारसरणी, तत्त्वनिष्ठा यांच्यापासून ते मतदारांच्या पदरात काय टाकणार यापर्यंत अनेक बाबींवर प्रचारात भर दिला गेला. त्या वेळी प्रचारसभा, चौकसभा, फारफार तर घरची भाजीभाकरी खावून बाहेर पडायचं, वणवण करत प्रचार करायचा आणि मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे खावून घरी परतायचे, असा क्रम होता. नंतर आली ढाबा संस्कृती. मतदारराजावर प्रभावासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्र-रात्र जागवून होऊ लागला. आज ते थांबलेले नाही, मात्र त्याचे स्वरूप बदलले. गेल्या दोन दशकात हळूहळू प्रचार तंत्रज्ञानावर स्वार झाला. दूरचित्रवाणींच्या चॅनल्सनी घरबसल्या ‘आखोंदेखा हाल’ दाखवणे सुरू केले. पाठोपाठ २०१४ च्या निवडणुकीत डिजिटायझेशनचा गवगवा झाला. त्याचा खुबीने वापर करत भाजपने सत्ता हस्तगत केली, समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केला. विरोधकांवर मात करत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार सत्तेवर आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तर समाज माध्यमांचा एवढा परिणामकारक वापर केला की, भाजपने सत्ता सहज हस्तगत केली. नेत्यांचे झंझावती प्रचारदौरा, भाषणे, वक्तव्ये यांच्यापेक्षाही अनेकपट प्रभाव दाखवला तो सोशल मीडियावरील प्रचाराने. समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रांतीय, शहरी, निमशहरी, ग्रामीण अशा अनेकविध प्रकारे वर्गवारी करत त्यांच्यात त्या-त्या निकषांनुसार प्रचार सोशल मीडियावर केला गेला आणि विरोधकांवर मात केली. यासाठी भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालयातील सोशल मीडिया सेल सुसज्ज असून, त्याचे कार्य वरिष्ठ पक्ष पदाधिकाऱ्यांनाही पूर्णपणे उमगलेले आहे, इतकी त्याबाबत गुप्तता बाळगली आहे. मग मुंबईतील कार्यालय कसे आहे, याबाबतही अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

आजच्या घडीला समाजमाध्यमांचा वापर करण्यात इतर पक्ष उतरले आहेत. मात्र खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणात समाज माध्यमांची ओळख भाजपनेच करून दिली आणि इतर पक्षांनी त्यांचे अनुसरण केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सोशल मीडिया वॉर रूम बनवली होती; मात्र तिचे ठिकाण गुप्त होते. त्या ठिकाणी पत्रकारांना सोडाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही सोडण्यात येत नव्हते इतकी खबरदारी घेतली जाते. विधानसभेच्या निवडणुकीसाठीही भाजपची सोशल मीडिया रूम मुंबईत सुसज्ज झाली आहे.

राज्य भाजपने सोशल मीडियाची रचना महसुली विभागाच्या धर्तीवर केली आहे. सहा महसुली विभागांप्रमाणे प्रत्येक विभागाला आयटी संयोजक आहे. विभागातील प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा संयोजक, त्यानंतर त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याला तालुका संयोजक, त्यानंतर गाव आणि बूथ पातळीवर संयोजक अशी उतरंडीची रचना आहे. सर्वांत वर राज्य संयोजक आहे. राज्य संयोजक म्हणून प्रवीण आलई काम पाहताहेत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीलादेखील भारतीय जनता पक्षाची तयारी जोरात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना व्हॉटस्‌-ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी साधनांचा वापर करण्यात येतो. प्रत्यक्ष काम करताना तीन स्तरांवर काम केले जाते. पहिल्यांदा कंटेंट म्हणजे आशय बनवतात. या आशयाला ग्राफिकची जोड दिली जाते. त्यानंतर हा कंटेट व्हायरल करतात. प्रत्यक्ष तयार झालेला मेसेज या वॉर रूमधून व्हायरल होतो. विभागीय पातळीवरून जिल्हा, त्यानंतर तालुका, मग बूथ पातळीवर पोचतो. या कंटेंटमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामाची माहिती, झालेली कामे, योजनांचा गोषवारा, यशोगाथा यांची माहिती पोचवली जाते. त्याचबरोबर स्टार प्रचारकांच्या सभा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह निवडक प्रमुख नेत्यांचे दरदिवशीचे नियोजन, त्यांची भाषणे, पत्रकार परिषदा आदींच्या क्‍लिप, मेसेज पाठवले जातात. 

सर्व २८८ मतदारसंघांची तयारी
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राज्यातील २८८ मतदारसंघांचा विचार करून त्या-त्या मतदारसंघाला अनुरूप उपयोगी पडणारा कंटेंट व्हायरल केला जाणार आहे. त्यामुळे दरदिवशीचे नियोजन करून राजकीय वातावरण पाहून मेसेज, कंटेंट तयार केला जात आहे. या प्रत्यक्ष कामासाठी राज्यभरात थेट ३०० तरुण कार्यरत आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. लोकसभेला शिवसेनेबरोबर भाजपची युती होती; मात्र विधानसभेसाठी अद्याप काही ठरलेले नाही. तरीही भाजपने २८८ मतदारसंघांचा विचार करून सोशल मीडियाची रचना केली आहे. यात केंद्र सरकारचा मागील पाच वर्षांतील कामांचा प्रचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामांची जाहिरात यावर भर देण्यात येणार आहे.

यावर असेल प्रचारात भर...
    केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा प्रचार.
    तोंडी तलाक, ३७० कलम रद्द करणे.
    राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prashant barsing article writes bjp