प्रश्‍नचिन्ह'च्या मदतीसाठी ''यिन'च्या तरुणाईचा पुढाकार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी साधला संवाद

सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी साधला संवाद

मुंबई : फासेपारधी समाजावर लागलेला चोरीचा कलंक पुसून टाकण्याचे व्रत सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी घेतले आहे. त्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या"प्रश्‍नचिन्ह' शाळेची कथा, त्यांची धडपड आणि त्या शाळेतील मुलांनी गायलेली गाणी ऐकून यिन कार्यशाळेतील उपस्थित भारावून गेले. विशेष म्हणजे भोसले यांच्या या डोंगराएवढ्या कार्याला "यिन'च्या तरुणाईने यथाशक्ती साह्य जाहीर केले. यशवंतराव चव्हाण केंद्रात सोमवारी (ता.29) भोसले यांनी कार्यशाळेच्या निमित्ताने तरुणाईबरोबर संवाद साधला. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या फासेपारधी आणि अन्य समाजांतील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर"प्रश्‍नचिन्ह'नावाने शाळा सुरू केली, असे मतीन भोसले यांनी सांगितले. "प्रश्‍नचिन्ह'नामागील गुपित उघड करताना त्यांनी सांगितले की, शाळेसाठी "भीख मॉंगो'मोहीम सुरू केली. मित्र आणि मान्यवरांनी शाळेसाठी विविध महापुरुषांची
नावे सुचविली. परंतु शाळा सुरू होण्यापूर्वी आणि नंतरही अनेक प्रश्‍नांचा सामना करावा लागत असल्याने अखेर शाळेला "प्रश्‍नचिन्ह' हे नाव दिले.
कार्यशाळेतील प्रश्‍नचिन्हमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार कवितांवर उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला."यिन'च्या जिल्हा प्रमुखांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या
तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भोसले यांनी जीवनसंघर्ष कथन केला. शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी समाजसेवेची कास धारली. पारधी समाजातील मुलांना शिक्षण
मिळावे, यासाठी त्यांनी शाळा काढण्याचे ठरवले. भीक मागणारी मुले, व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांना एकत्रित करून त्यांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेशर तालुक्‍यातील मागरूळ चव्हाळ या गावी पत्र्यांच्या शेडमध्ये शाळा सुरू केली.
त्यामध्ये 188 विद्यार्थी दहावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. कार्यशाळेत"प्रश्‍नचिन्ह'मधील विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. रोशनी पवार या पाच वर्षीय विद्यार्थिनीने आई विषयावरील कविता सादर केली. आई माझी मायेचा सागर... या ओळींनी उपस्थित महाविद्यालयीन युवक-युवतींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यापाठोपाठ गोपाळ पवार या विद्यार्थ्याने मुजरीमना
कहना मुझे लोगो, मुजरिम तो सारा समाज है... हे गीत सादर केले. या गीताचेही उपस्थितांनी कौतुक केले. मतीन यांच्या कार्याची दखल घेत उपस्थितांनीही शाळेतील मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला. यिनचे प्रमुख तेजस गुजराथी यांनी "प्रश्‍नचिन्ह'मधील पाच विद्यार्थ्यांना वर्षाला हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली. या विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षण
देण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांना केली. "यिन'च्या जालना टीमने या शाळेला दान स्वरूपात पुस्तके घेऊन ती शाळेला देण्याचे आश्‍वासन दिले.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचे ओमप्रकाश शेटे यांनीही त्यांच्या वेतनातील रकमेतून शाळेसाठी संगणक देण्याचे जाहीर केले.

Web Title: Prasnacinha trust '' yin youth initiative

फोटो गॅलरी