अतिक्रमणे काढा अन्यथा; कायमचे वनात पाठवू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई - प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमणे तत्काळ हटवावीत; अन्यथा तेथील वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी न्यायालयाने वारंवार आदेश दिले आहेत.

मुंबई - प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमणे तत्काळ हटवावीत; अन्यथा तेथील वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी न्यायालयाने वारंवार आदेश दिले आहेत.

त्यानंतरही या आदेशांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही न्यायालयाने विचारला. 
मिलिंद एकबोटे यांनी अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत तेथील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने एकबोटे यांनी पुन्हा प्रशासनाविरोधात न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायाधीश बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

कबर कोणाच्या जागेत आहे व अतिक्रमणे कोणत्या जागेत आहेत, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर, कबर महसूल विभागाच्या जागेत आहे, अतिक्रमणे वन खात्याच्या भूखंडात आहेत, असे याचिकाकर्त्याने सांगितले. ही माहिती ऐकताच न्यायालय चांगलेच संतप्त झाले. आतापर्यंत सरकारी पक्षाने काय कारवाई केली, अशी विचारणाही खंडपीठाने सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांच्याकडे केली. मात्र, यावर समाधानकारक उत्तर देता आले नसल्याने, न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. वन अधिकारी आदेश देऊनही कारवाई करत नसतील, तर त्यांना तुरुंगात शिक्षा भोगायला पाठवायला हवे किंवा त्यांना कायमचे वनातच ठेवायला हवे. जे अधिकारी कारवाई करत नसतील, त्यांची नावे न्यायालयात सादर करा, आम्ही योग्य ते आदेश देऊ, असे न्यायालयाने स्पष्ट करत सुनावणी तहकूब केली.

Web Title: pratapgad fort issue