नाट्य संमेलनाध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी 

नाट्य संमेलनाध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी 

मुंबई - 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावे चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. याची घोषणा शुक्रवारी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या तालीम हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केली. 

99 व्या नाट्य संमेलनाच्या स्थळासाठी परिषदेकडे 12 ठिकाणांहून प्रस्ताव आले. त्यापैकी नागपूर, लातूर, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा अंतिम टप्प्यात विचार करण्यात आला. वरील ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करेल. संमेलन फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान होईल, अशी माहिती प्रसाद कांबळी यांनी दिली. 

नाट्य परिषदेच्या निवडणुकीवेळी गैरव्यवहार टाळण्यासाठी नाट्य परिषद सर्व शाखांचे आणि सभासदांचे ऑडिट नाट्य परिषद करणार आहे. नाट्य परिषदेला जीएसटीच्या माध्यमातून 19 लाख 60 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती कांबळी यांनी दिली. नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने मिळावे यासाठी घटनेत दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामागील ज्येष्ठ रंगकर्मी सन्मान व्हावा हा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. 

गाजलेले "किरवंत' 
नाटककार, साहित्यकार प्रेमानंद गज्वी यांच्या नावाची चर्चा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलन या दोन्ही संमेलनांच्या अध्यक्षपदासाठी झाली. साहित्य संमेलनात यश आले नसले तरी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गज्वी यांची निवड झाली. त्यांची "तनमाजोरी', "किरवंत' आदी नाटके प्रचंड गाजली. त्यांच्या नाटकांची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली असून, देशभरात ठिकठिकाणी त्यांच्या नाटकांचे प्रयोग चालू आहेत. बोधी नाट्य चळवळीमुळे देशभरातील रंगकर्मी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com