हिंदुस्थानियत सोडू नका - नयनतारा सहगल

बुधवार, 30 जानेवारी 2019

मुंबई - सध्याचा काळ खूप कठीण आहे. अशा वातावरणात गप्प बसणे त्याहून धोक्‍याचे आहे. विविधतेत एकता ही हिंदुस्थानची ओळख आहे. ही हिंदुस्थानियत कधीही सोडणार नाही, असा निर्धार सर्वांनी करावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी मंगळवारी केले. 

मुंबई - सध्याचा काळ खूप कठीण आहे. अशा वातावरणात गप्प बसणे त्याहून धोक्‍याचे आहे. विविधतेत एकता ही हिंदुस्थानची ओळख आहे. ही हिंदुस्थानियत कधीही सोडणार नाही, असा निर्धार सर्वांनी करावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी मंगळवारी केले. 

यवतमाळ येथे झालेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्‌घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्यात आले होते. त्याबद्दल त्यांची माफी मागण्यासाठी "चला एकत्र येऊ या!' हा कार्यक्रम मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात झाला. या वेळी सहगल यांनी सर्वांचे आभार मानले. ""साहित्य संमेलनात न वाचल्या गेलेल्या माझ्या भाषणाचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अभिवाचन झाले. हे फक्त महाराष्ट्रातच घडू शकते. म्हणूनच मी आज जय महाराष्ट्र म्हणते'', अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या भाषणाला महाराष्ट्रातील इतक्‍या लोकांनी समर्थन दिले. त्याबद्दल मी खूप आभारी आहे, असेही त्या म्हणाल्या. 

हिंदू राष्ट्र बनविण्याचा कट 
या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न आज केला जात आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे मूळ स्वरूप आहे. देशात बहुभाषिक, बहुविचारांचे आणि विविध धर्मांचे लोक आहेत. हीच आपली खरी ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा कट रचला जात आहे. आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. ही हिंदुस्थानियत आपण कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन सहगल यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ भाषा अभ्यासक गणेश देवी, अभिनेते अमोल पालेकर, लेखिका पुष्पा भावे, नाटककार जयंत पवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

चित्रपटसृष्टी गप्प का 
स्वातंत्र्याची मुस्कटदाबी सुरू असतानाही चित्रपटसृष्टी गप्प बसली आहे, अशी खंत नयतनतारा सहगल यांनी व्यक्त केली. मला डेहराडून येथे नसीरुद्दीन शाह यांचा दुःखी आवाज ऐकू आला. हा आवाज प्रत्येक मुस्लिमाचा आहे. नसीरुद्दीन यांनी केवळ स्वतःच्या मुलांसाठी नव्हे; तर सर्व मुस्लिम बांधवांसाठी आवाज उठवला; पण त्याच्या बाजूने चित्रपटसृष्टीतील एकही कलाकार उभा राहिला नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे, असे त्या म्हणाल्या.