राष्ट्रपती निवडणूक भाजपसाठी कळीची

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 मार्च 2017

शिवसेनेबरोबर समेटाची चिन्हे

शिवसेनेबरोबर समेटाची चिन्हे
मुंबई - यशाच्या शिखरावर असलेल्या भाजपने मित्रपक्ष शिवसेनेवर राजकीय कुरघोडीची सुरू ठेवलेली भूमिका मवाळ होऊन समेट घडण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची भाजपला गरज असल्याने शिवसेनेसोबत सबुरीने घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून आल्याचे समजते. यामुळेच विधानसभेत शिवसेनेला कर्जमाफीवर बोलण्याची संधी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे कौतुक करत आभार मानले. मात्र, यामागे भाजपला शिवसेनेची गरज असल्यानेच सध्या सबुरीचे धोरण स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

केंद्रात व राज्यात सत्तेत आल्यापासून शिवसेनेला शह देण्याचे सर्व प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून सुरू असल्याचा दावा केला जात आहे. महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्तेत येईल यासाठीचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढत विरोधी पक्षातले काही आमदार फोडण्याची तयारी सुरू असल्याची बातमी फोडण्यात आली. याशिवाय, मुदतपूर्व निवडणुकीची तयारीही भाजपने सुरू केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, या सर्व अफवा असून राजकीय चर्चा व तर्क तपासण्याची एक पद्धत असल्याचे काही राजकीय नेत्यांचे मत आहे. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार फुटले, तर त्यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकच उमेदवार देतील असा इशारा अजित पवार यांनी दिल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले. त्यातच जिल्हा परिषदांमध्ये भाजपला एकाकी पाडण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत अनेक ठिकाणी आघाडी केली.

वाढत्या राजकीय स्पर्धेत भाजप एकाकी पडत असल्याने राजकीय जोखीम नको, असा भाजपच्या काही नेत्यांचा सूर असल्याचे सांगण्यात येते. त्यातच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडे 25 हजार मतांचे मूल्य आहे. एवढी मोठी मते भाजपकडून बाजूला जाणार नाहीत याची काळजी म्हणून शिवसेनेसोबत समेटाचे सर्व सोपस्कार करण्याची तयारी सुरू असल्याची चिन्हे आहेत.

Web Title: president election bjp plnning