उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा अन् मिळवा 151 रुपये

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये केलेल्या भाषणाचा अर्थ ज्याला कळला असेल, त्यांनी समजावून सांगितल्यास त्यांना 151 रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये केलेल्या भाषणाचा अर्थ ज्याला कळला असेल, त्यांनी समजावून सांगितल्यास त्यांना 151 रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

ऊद्धव ठाकरेंनी पंढरपूरमध्ये सोमवारी (ता. 24) जे भाषण केले त्यावर मनसेने खोचक टोलेबाजी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा आणि 151 रुपये मिळवा, अशी ऑफरच मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली आहे. "काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे म्हणते होते की आम्ही 25 वर्ष युतीत सडलो. आता म्हणत आहेत की भाजपसोबत युती करायची की नाही याचा निर्णय जनताच ठरवेल. आम्हाला कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये रस नाही, हे उद्धव ठाकरेंचे बोलणं न कळण्यासारखं आहे. युतीचा निर्णय जनता घेईल असे सांगत उद्धव ठाकरेंनी युतीची दारे पूर्ण बंद झालेली नाहीत हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या पंढरपुरातील भाषणाचं जो कुणी विश्लेषण करेल आणि त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ आम्हाला समाजावून सांगेल, त्यांना मनसेकडून 151 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल", अशी घोषणाही संदीप देशपांडे यांनी केली.

दरम्यान, "शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटलेले नसताना जागावाटप करत बसण्यात आपल्याला स्वारस्य नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, राममंदिर झाले पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसानभरपाईचा पैसा दिला गेला पाहिजे. तुम्ही हे करणार नसाल तर तुमच्या मांडीला मांडी लावून कशाला बसू? जागावाटप गेले खड्ड्यात. सत्ता नसली तरी चालेल; परंतु शेतकरीरूपी पांडुरंगाचा आशीर्वाद मला पाहिजे,'' असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सभेत भाजपवर टीकेची तोफ डागली. "राफेल' गैरव्यवहार, पीक कर्ज विमा गैरव्यवहार, कर्जमाफी आदी विषयांवरून त्यांनी, भाजपला किती पापे करणार आहात, असा प्रश्‍न केला.
"आधी मंदिर, मग सरकार', अशी भूमिका घेऊन गेल्या महिन्यात अयोध्येत रणशिंग फुंकल्यानंतर उद्धव यांनी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानीतही त्याचा पुनरुच्चार केला. भाजपने शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिले.

सभेला अपेक्षित प्रतिसाद नाही
चंद्रभागानगर बसस्थानकाच्या 27 एकर मैदानावर उद्धव यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सुमारे पाच लाख लोक उपस्थित राहतील आणि ही सभा ऐतिहासिक तसेच न भूतो न भविष्यती होईल. महाराष्ट्रातील सभांचे रेकॉर्ड ब्रेक करणारी ही सभा होईल, अशा प्रकारचे दावे शिवसेना नेत्यांनी केले होते; परंतु त्यामानाने सभेला अपेक्षित गर्दी झाली नाही.  

..म्हणून राममंदिराचा मुद्दा
राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर घेतला, होय घेतला, मी ताकाला जाऊन भांडे लपवणारा माणूस नाही, राममंदिराचा मुद्दा यासाठी घेतला की, 28 ते 30 वर्षे झाली, तुम्ही काहीच करत नाही, केवळ निवडणुका आल्या की, तुमच्या अंगात देव घुमायला लागतो, पण आम्ही मात्र भोळे आहोत, पण बावळट नाही, हे लक्षात घ्या, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. तसेच रामविलास पासवान, नितीशकुमारांना भाजपाप्रती उपरती झाली आहे, असेही ते म्हणाले.

पाच राज्यांनी धूळ चारली
पाच राज्यांत निवडणुका झाल्या. देशभरात गावापासून काश्मिरपर्यंत समज पसरला होता, की आम्हीच. पण हा समज या निवडणुकांनी खोडून काढला आहे. मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांनी तर प्रादेशिक पक्षांना सत्तास्थानी बसवून राष्ट्रीय पक्षाला चांगलीच धूळ चारली आहे. छत्तीसगडने तर घाण साफ केली. ही ताकद आता महाराष्ट्रातील शिवसैनिकही दाखवून देतील.

Web Title: price 151 rs from mns for explaination of uddhav thackerary speech