हिरव्या मिरचीचे भाव गडगडले 

The prices of green chillies collapsed
The prices of green chillies collapsed

नाशिक : सणासुदीच्या दिवसात चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी हिरव्या मिरचीने पळवले. यंदाच्या खरिपातील पहिली तोडणी सुरू झाली असून, भाव गडगडलेत. शेतकऱ्यांना किलोला दहा रुपये मिळताहेत, तर दुसरीकडे ग्राहकांना 30 ते 40 रुपये द्यावे लागताहेत. 

नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात काही वर्षांपूर्वी केवळ उन्हाळ्यात 15 हजार हेक्‍टरवर हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले जायचे. आता हिरव्या मिरचीचे उत्पादन खरीप, रब्बी, उन्हाळ अशा तीनही हंगामांत घेतले जात आहे. तिचे क्षेत्र 75 हजार हेक्‍टरपर्यंत पोचले आहे. नाशिक बाजार समितीमध्ये या आठवड्यापासून हिरवी मिरची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागली आहे. सध्यस्थितीत तिला मिळणारा भाव पाहता, उत्पादन खर्च निघणे मुश्‍कील झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटू लागली आहे. 

फुलकीड, पांढरी माशीसाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांचा; तर पाने गुंडाळण्यावर उपाय म्हणून आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर केला जातो. मुळातच, आखाती देशांमध्ये तिखटपणामुळे उत्तर महाराष्ट्रातील हिरव्या मिरचीला विशेष मागणी असली, तरीही कीटकनाशक अन्‌ बुरशीनाशकांचे उर्वरित अंश सापडत असल्याने व्यापाऱ्यांकडून हिरवी मिरची निर्यात करण्याकडे कल पाहावयास मिळत नाही. सध्या तोडणी सुरू असलेली मिरची नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारात विक्रीसाठी येईल. रब्बीची लागवड सुरू करण्याच्या विचारात शेतकरी असताना भाव कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये लागवडीबद्दलची चलबिचल सुरू झाली आहे. रब्बीमधील मिरची जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत बाजारात येत असताना शेतकऱ्यांकडून उन्हाळी मिरचीची लागवड सुरू होईल. ही मिरची एप्रिल ते जूनपर्यंत विकली जाते. 

भाव कोसळण्यामागे व्यापाऱ्यांचे कुटील नित्ती कारणीभूत आहे. पणन विभागाने यात लक्ष घालून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवायला हवी; अन्यथा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल. 
- हंसराज वडघुले (युवा प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com