गिर्यारोहकांचा गट विमा काढण्याला प्राधान्य - तावडे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई - अपघातात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणे आणि अपघातातील मृतांचे मृतदेह बाहेर काढून त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्त करण्याचे काम गिर्यारोहक आपल्या जिवाची बाजी लावून करीत असतात. अशा जिगरबाज गिर्यारोहकांचा गट विमा असणे ही अत्यंत आवश्‍यक बाब आहे. येणाऱ्या काळात विविध विमा कंपन्यांशी चर्चा करून गिर्यारोहकांचा गट विमा करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.

मागील आठवड्यात महाबळेशवर आंबेनळी घाटात बस अपघात झाला होता. या घाटात जवळपास 500 फूट दरीत बस पडली होती. या बसमधील व्यक्तींचे मृतदेह दरीतून वर काढण्याच्या मदतकार्यात महाबळेश्वर, महाड आणि पोलादपूर येथील गिर्यारोहण संस्थांच्या सदस्यांनी निरपेक्ष आणि कर्तव्य भावनेतून काम केले. क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज त्या गिर्यारोहकांचे पुस्तक देऊन कौतुक करण्यात आले. या वेळी क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाचे अधिकारी यांच्यासह सह्याद्री मित्र, यंग ब्लड ऍडव्हेन्चर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स यांच्यासह ट्रेकर्स ग्रुप उपस्थित होते.

तावडे म्हणाले, की आपत्कालीन परिस्थितीत गिर्यारोहक बचतकार्यासाठी जात असतात तेव्हा त्यांच्य्याकडे अत्याधुनिक सामग्री असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात 20 जिल्ह्यांतील गिर्यारोहकांच्या ग्रुपना क्रीडा विभागामार्फत अत्याधुनिक सामग्री देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याबरोबरच गिर्यारोहकांना पोलिसांमार्फत ओळखपत्र दिल्यास त्यांना मदत करण्यासाठी जाताना या ओळखपत्राचा फायदा होईल. त्यामुळे याबाबतही पोलिसांबरोबर चर्चा करण्यात येईल.

Web Title: Priority to cover insurance Mountaineer vinod tawde