काँग्रेसची ताकद वाढली तरी आघाडी : पृथ्वीराज चव्हाण

मधुकर कांबळे
रविवार, 16 डिसेंबर 2018

मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती विषयी ते म्हणाले, सरकारने लोकांशी संवाद साधून त्यांना विश्वास दिला पाहिजे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीर आहे. तातडीने रोजगार हमीची कामं सुरू झाली पाहिजेत, चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत, तहसीलदार स्तरावर पाण्याचे टँकर सुरू करण्याचे अधिकार दिले पाहिजेत.

औरंगाबाद : पाच राज्यातील निवडणुक निकालानंतर काँग्रेसची ताकद वाढली आहे. असे असले तरी सध्या लोकशाहीला धोक्यात आणणाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पक्षांसोबत आघाड्या करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (ता. 16 ) औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आज एका कार्यक्रमानिमित्त आले होते, या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, सध्या देशात आणि राज्यात लोकशाहीला मजबूत करणाऱ्या संस्था धोक्यात आलेल्या आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आघाड्या स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय इतर लहान मोठ्या पक्ष्यांचीशीदेखील आघाडीबाबत चर्चा केली जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षानंही आघाडीमध्ये यावं अशी आमची इच्छा आहे. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये हीच काँग्रेसची भूमिका आहे, तथापि एमआयएमला बरोबर घेणार नाही कारण तो जातीयवादी पक्ष आहे असेही श्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती विषयी ते म्हणाले, सरकारने लोकांशी संवाद साधून त्यांना विश्वास दिला पाहिजे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीर आहे. तातडीने रोजगार हमीची कामं सुरू झाली पाहिजेत, चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत, तहसीलदार स्तरावर पाण्याचे टँकर सुरू करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. सरकारने दिवास्वप्न दाखवणे सोडून दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Prithviraj Chavan talked about Congress NCP alliance