कर्जमाफीसाठी घ्यावे शासनाने कर्ज- पृथ्वीराज चव्हाण

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 3 एप्रिल 2017

संघर्ष यात्रेचा हा पाचवा दिवस आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सतत सुरु राहिले पाहिजे, संघटन शक्ती विशेषतः शेतकरी व त्यांच्या मुलांनी या संघर्ष यात्रेत सहभागी झाले पाहिजे. कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता आहे. मात्र पैसे नाहीत हे कारण सांगितले जाते.​

सोलापूर - "सध्या सुरु असलेल्या संघर्षयात्रेने लगेच काही साध्य होणार नाही. हा संघर्ष कायम सुरु राहिला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात संघटन होणे आवश्‍यक आहे. त्यांच्या मुलांनीही या संघर्षयात्रेत सहभागी झाले पाहिजे'', असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

संघर्ष यात्रेचा काल (रविवारी) सोलापुरात मुक्काम होता. आज सकाळी पंढरपूरला रवाना होण्यापूर्वी चव्हाण यांनी शासकीय विश्रामधाम येथे "सकाळ'शी संवाद साधला.

चव्हाण म्हणाले, "संघर्ष यात्रेचा हा पाचवा दिवस आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सतत सुरु राहिले पाहिजे, संघटन शक्ती विशेषतः शेतकरी व त्यांच्या मुलांनी या संघर्ष यात्रेत सहभागी झाले पाहिजे. कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता आहे. मात्र पैसे नाहीत हे कारण सांगितले जाते. इतर ठिकाणी द्यायला सरकारकडे पैसे आहेत, मात्र कर्जमाफीसाठी नाहीत असे सद्याचे चित्र आहे. कर्जमाफीसाठी 30 हजार कोटी रुपयांची गरज आहे, ही रक्कम सरकारने कर्जरुपाने उभे करावे, त्यासाठी महसुली उत्पन्न वाढवावे.''

सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी हा मुद्दा घेतला होता. मात्र निवडणुकीनंतर त्याचा विसर त्यांना पडला. कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांना पुरक साहित्य उपलब्ध केल्यास भाजप सरकारच्या कालावधीत शेतीचे 10 ते 12 टक्के उत्पन्न वाढेल. शेतीमध्ये सरकारने गुंतवणूक वाढविली पाहिजे, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असेही चव्हाण म्हणाले.

Web Title: Prithviraj Chavan talked about farmers loan waiver