खासगी मनमानी भाडेआकारणीस चाप!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई - राज्यातील खासगी प्रवासी वाहनांचे कमाल भाडेदर परिवहन विभागाने निश्‍चित केले आहेत. कोणत्याही हंगामात या कमाल भाडेदराच्या वर भाडेआकरणी करता येणार नाही. ही भाडेवाढ राज्य परिवहन मंडळाच्या विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या गाड्यांच्या तिकीट भाड्याच्या पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक राहणार नाही. त्यामुळे सणासुदीला अथवा उन्हाळी सुटीच्या हंगामात अवाच्या सव्वा तिकीट भाडे आकारून गरजू प्रवाशांना नाडणाऱ्या राज्यातील खासगी प्रवासी वाहनांना यापुढे चाप बसणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे वर्षाला सुमारे सहा ते आठ हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

राज्यात कोट्यवधी प्रवासी खासगी वाहनांतून प्रवास करतात. या प्रवाशांकडून गर्दीच्या हंगामात खासगी प्रवासी वाहतूक कंपन्या मनमानी भाडे आकारत असल्याच्या अनेक तक्रारी परिवहन विभागाकडे आल्या होत्या. तसेच याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर दिलेल्या खटल्याच्या निवाड्यात खासगी कंत्राटी वाहनांचे भाडे सरकारने निश्‍चित करावे, असे आदेश देण्यात आले होते.

या आदेशाचे पालन करण्यासाठी परिवहन विभागाने "सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट' या केंद्र सरकारच्या संस्थेची नियुक्‍ती केली होती. या संस्थेने वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सुविधांचा अभ्यास केला. साधी, वातानुकूलित, शयनयान आदी सेवा देणारी वर्गवारी तयार केली. त्यासोबत प्रत्येक वर्गवारीतील वाहनांचा मोटार कर, इंधन खर्च, देखभाल खर्च आदी विचारात घेऊन खासगी प्रवासी गाड्यांचे प्रति किलोमीटर जास्तीत जास्त भाडे निश्‍चित केले आहे.

एसटीच्या साधी, निमआराम, शिवशाही, शयनयान, शिवनेरी या सेवा देताना संबंधित वाहन, त्याची आसन क्षमता आणि प्रति किलोमीटर प्रतिमाणशी या बाबी विचारात घेऊन भाडेदर निश्‍चित केला जातो. एसटी सेवेचा हा भाडेदर गृहीत धरून त्यावर जास्तीत जास्त 50 टक्‍के इतकी वाढ खासगी प्रवासी कंपन्यांना करता येणार आहे. मात्र ती सध्या दुप्पट, अडीच पट अशी मनमानी केली जात होती.

प्रवाशांचे फायदे
- सणासुदीला, दिवाळी, गणपती उत्सव, उन्हाळ्याच्या हंगामात लूट थांबणार.
- जास्त भाडे आकारणी केली तर परिवहन विभागाकडे तक्रार करता येणार.
- जादा भाडेआकारणीची तक्रार आल्यानंतर कारवाईत वाहन परवाना रद्द होऊ शकतो.
- निश्‍चित भाडेआकारणीमुळे प्रवासाचे आर्थिक नियोजन करता येणार.

गर्दीचे हंगाम आणि दिवस
- दिवाळी- 8, गणपती उत्सव- 5, उन्हाळी सुटी- 20, आठवडी सुटीला जोडून येणारे- 100

- वर्षभरातील गर्दीच्या हंगामाचे दिवस सुमारे - 120
- राज्यातील खासगी बसगाड्यांची संख्या सुमारे - 25 हजार
- एका वाहनाचा दिवसाला प्रवास सरासरी - 400 किलोमीटर
- एका वाहनाचा वर्षाचा प्रवास - 1 लाख 50 हजार किलोमीटर
- एका वर्षाला एका वाहनापासून मिळणारे भाडे - 90 लाख रुपये
- एका वाहनास एका किलोमीटरसाठी मिळणारे भाडे - 60 रुपये
- एका वाहनाची प्रवासी आसन क्षमता - 44 ते 60
- वर्षाला 25 हजार वाहनांपासून मिळणारे भाडे उत्पन्न सुमारे - 22 हजार 500 कोटी रुपये
- एका दिवसाचे खासगी कंपन्यांना भाडे आकारणीतून मिळणारे उत्पन्न अंदाजे - 61 कोटी रुपये
- ऐन गर्दीच्या हंगामातील भाडे आकारणीचे उत्पन्न - 8 हजार कोटी रुपये

Web Title: private bus rent high