'तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर पूर्ण करा '

'तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर पूर्ण करा '

मुंबई - तूरउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येत्या पाच ते सहा दिवसांत अतिरिक्त यंत्रणा राबवून, तसेच दोन पाळ्यांमध्ये काम करून उर्वरित तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान दिले. 

""तुरीला योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे तूरउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, तूर व तूरडाळींचे भाव किफायतशीर व स्थिर राहावेत, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यातील तुरीच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून 40 लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. खरेदी केंद्रांवर उर्वरित नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी प्रक्रिया सुरू असून ती येत्या पाच-सहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे,'' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

अमरावती विभागात सर्वाधिक तूर खरेदी बाकी असल्याचे लक्षात घेऊन खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. धारणीमध्ये अतिरिक्त केंद्र सुरू करण्यात आले असून आता एकूण 11 केंद्रांवर खरेदी सुरू आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रांवर दहा वजनकाटे ठेवण्यात आले आहेत. पुरेशा प्रमाणात ग्रेडर उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागातील पर्यवेक्षक, तसेच सहायक निबंधक यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून तुरीचे जलद ग्रेडेशन करून खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली आहे. तसेच साठवणुकीसाठी खासगी गोदामांचे अधिग्रहण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

चांगले पर्जन्यमान आणि राज्य शासनाच्या विविध उपाययोजनांमुळे राज्यात सन 2016-17 मध्ये 15.33 लाख हेक्‍टर क्षेत्रावर तुरीची पेरणी होऊन भरघोस उत्पादन झाले. सन 2015-16 या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच पट अधिक उत्पादन झाले आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील तुरीचे भाव घसरल्यामुळे शासनाने तातडीने राज्यातील 323 खरेदी केंद्रांवर तूर खरेदीची सुविधा निर्माण केली होती. जास्तीत जास्त तुरीची खरेदी होण्यासाठी राज्याने केंद्र सरकारला वेळोवेळी विनंती केल्याने 22 एप्रिलपर्यंत तीन वेळा मुदतवाढ (ता. 31 मार्च, 15 एप्रिल आणि 22 एप्रिल) मिळाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com