जावई माझा लाडका; गाढवावर मिरवला

दत्ता देशमुख
सोमवार, 13 मार्च 2017

विडेकरांनी जपली 90 वर्षांची परंपरा

गाढवावरून मिरवणूक काढणे हा अपमानाचा नव्हे तर परंपरेचा प्रकार असल्याने अगोदर 'का कू' करणारे जावई पकडल्यानंतर पुन्हा गुमान तयार होतात.

बीड : लग्नात घोड्यावरून वरात काढण्यासाठी जावई रुसतात. पण, विडा ता केज या गावात धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा ग्रामस्थांनी 90 वर्षांपासून जपली आहे. सोमवारी (ता 13) शिंधी ता केज येथील गजानन जवंजाळ यांची मिरवणूक काढण्यात आली.  

तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला 90 वर्षांपूर्वी धुलिवंदनाच्या दिवशी मिरविले, आणि गावासाठी ही परंपराच झाली. आतापर्यंत विविध जाती-धर्मातील जावयांना हा सन्मान गावकऱ्यांनी दिला आहे. त्यातून साधी कुरबुरही कधी झाली नाही.

गाढवावरून मिरवणूक काढणे हा अपमानाचा नव्हे तर परंपरेचा प्रकार असल्याने अगोदर 'का कू' करणारे जावई पकडल्यानंतर पुन्हा गुमान तयार होतात. मग कोणाच्याही कोणत्याही जावयाला मिरविले जाते. पण एका वर्षी संधी मिळालेल्या जावयाला पुन्हा ही संधी दिली जात नाही. यंदा परिसरातील शिंधी येथील गजानन जवंजाळ यांना हा मान भेटला. 

चपलेचा हार घातलेल्या गाढवावर बसवलेले जावई, समोर रंगाची उधळण करत, ढोली बाजाच्या तालावर थिरकणाऱ्या युवकांच्या जल्लोषात ही मिरवणूक मुख्य रस्त्याने निघून मारुती मंदिरासमोर विसर्जित झाली. यावेळी गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते जावई जवंजाळ यांना मनपसंत कपड्यांचा आहेर करण्यात आला.
 

Web Title: procession of son in law on donkey in beed