राज्यात 180 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन

प्रदीप बोरावके
रविवार, 2 डिसेंबर 2018

राज्यात चालू गळीत हंगामात 30 नोव्हेंबरअखेर 184.66 लाख टन उसाचे गाळप होऊन 180.52 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.78 टक्के इतका आहे.
 

माळीनगर- राज्यात चालू गळीत हंगामात 30 नोव्हेंबरअखेर 184.66 लाख टन उसाचे गाळप होऊन 180.52 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.78 टक्के इतका आहे.

यंदाच्या हंगामात राज्यात आतापर्यंत 87 सहकारी व 73 खासगी मिळून 160 कारखाने चालू झाले आहेत. कोल्हापूर विभागातील 33 कारखान्यांत 34.45 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 35.94 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागात सर्वाधिक 55 कारखाने सुरू आहेत. या विभागात 83.62 लाख टन उसाचे गाळप होऊन 82.09 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

नगर विभागातील 22 कारखान्यांनी 29.77 लाख टन उसाचे गाळप करून 28.63 लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नांदेड विभागातील 24 कारखान्यात 19.24 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 17.80 लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. औरंगाबाद विभागातदेखील 24 कारखाने सुरू आहेत. या विभागात 17.28 लाख टन उसाचे गाळप होऊन 15.53 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. अमरावती व नागपूर विभागात आतापर्यंत प्रत्येकी एक कारखाना चालू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात शिंदे कारखान्याची आघाडी 
सोलापूर जिल्ह्यातील 28 कारखान्यात यंदाच्या हंगामात 41.08 लाख टन उसाचे गाळप होऊन 38.65 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 9.41 टक्के आहे. गाळपात पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे कारखाना राज्यात आघाडीवर आहे. या कारखान्याने आतापर्यंत पाच लाख 26 हजार 401 लाख टन उसाचे गाळप केले आहे. सातारा जिल्ह्यातील जयवंत शुगर 11.44 टक्के सरासरी साखर उतारा मिळवून राज्यात अग्रेसर आहे. 

Web Title: Production of 180 lakh quintals of sugar in the state