वऱ्हाडात दुधाळ जनावरांना फटका; चाऱ्याअभावी दुग्धोत्पादनात घट

वऱ्हाडात दुधाळ जनावरांना फटका; चाऱ्याअभावी दुग्धोत्पादनात घट

अकोला : दुष्काळाची दाहकता मे महिन्यात जास्त जाणवू लागली आहे. वाढत्या उन्हाबरोबर दुष्काळाचा वऱ्हाडातील 19 लाख पाच हजार 818 पशुधनाला फटका बसत आहे. प्रथिनयुक्त खाद्य व हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने वाळलेल्या चाऱ्यावर जनावरांची भूक भागवावी लागत असल्याचा परिणाम दुधाळ जनावरांवर जास्त प्रमाणात होत असल्याने दुग्धोत्पादनात घट झाली आहे. अशी परिस्थिती राज्यातील सर्वच भागांत दिसून येत आहे.

दुधाळ जनावरांसाठी आवश्‍यक असलेल्या सरकीच्या ढेपीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने दुग्धोत्पादनाला फटका बसत आहे. दुधाळ जनावरांच्या खाद्याकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढविण्यासाठी मोठा फायदा होतो. त्यामध्ये प्रथिनयुक्त खाद्य त्यांना मिळाले, तर गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतु, सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे असे खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे दर पशुपालकांना परवडणारे नाहीत. बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ तीव्र स्वरूपाचा असल्याने याचा फटका पशुधनालाही अधिक बसत आहे.

दुष्काळी परिस्थितीत लहान पशुधनाला पिण्यासाठी प्रतिदिवस साधारणतः 20 लिटर पाणी, तर तीन किलो चारा आणि मोठ्या पशुधनाला 40 लिटर पाणी आणि सहा किलो चारा लागत असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वर्षी विहीर, बोअरचे पाणी आटल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे कठीण झाले आहे. यामुळे दुधाळ पशुधनाची भूक सोयाबीन, तूर, हरभरा या वाळलेल्या चाऱ्यावरच भागवावी लागत आहे. किरकोळ ठिकाणीच हिरवा मका व अन्य चारा पशुधनाला टाकला जात आहे.

सध्या वाळलेला चाराच पशुधनासाठी वरदान ठरत आहे. वाळलेल्या चाऱ्यावर काही दिवस भागेल एवढी तरतूद असली, तरी हिरवा चारा नसल्याने दूध उत्पादन दहा टक्के घटले आहे. 

पशुधनाची संख्या (19 व्या पशुगणना 2012 नुसार) 

जिल्हा पशुधन संख्या 
अकोला 4 लाख 65 हजार 913 
बुलडाणा 9 लाख 80 हजार 876 
वाशीम 4 लाख 59 हजार 029 
एकूण 19 लाख 05 हजार 818 

गाळपेर दोन हजार हेक्‍टर क्षेत्र 

दुष्काळ जाहीर केलेल्या भागात एक कोटी 80 लाख पशुधन आहे. या भागासाठी 116.27 लाख टन चाऱ्याची आवश्‍यकता भासणार असल्याचे लक्षात घेत चारा उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते.

याकरिता जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनविकास, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना आदींमधून चारा उत्पादनासाठी राज्यभरातून सुमारे दोन हजार हेक्‍टर गाळपेर क्षेत्र शोधून त्यावर चारा उत्पादन घेण्यासाठी बियाणे वाटप केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com