प्राध्यापक भरती थंडावल्याने इच्छुक चिंतेत

Teacher
Teacher

पुणे - राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी जवळपास नऊ हजार 571 प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे जाहीर केले. त्यातील जवळपास तीन हजार 580 सहायक प्राध्यापकांच्या प्रक्रियेचा निर्णय सरकारने घेतला.

मात्र, राज्यातील विद्यापीठांमधील आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया थंडावल्याचे दिसत असून, त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील 2013पासून टप्प्याटप्प्याने प्राध्यापकांची भरती बंद करण्यात आली. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांत जवळपास 40 हजार
नेट-सेटधारक, पीएचडीधारक प्राध्यापक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा आता फोल ठरली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सरकारी अध्यादेश काढत भरतीप्रक्रिया जाहीर केली. त्यात सहायक प्राध्यापकांच्या तीन हजार 580 जागांसह शारीरिक शिक्षक संचालक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक अशा एकूण चार हजार 738 पदांवरील भरतीचा निर्णय घेतला. त्यानुसार एकूण रिक्त पदसंख्येच्या 40 टक्के जागा भरण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयाला काही महिने उलटल्यानंतरही भरतीप्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळते.

भरतीप्रक्रियेचा निर्णय जाहीर झाल्यानंतरही काही हालचाली होत नसल्याने काही दिवसांपूर्वी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा सरकारला दिला. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाने जागे होत रिक्त जागांवर प्राध्यापक भरतीसाठी महाविद्यालयांना "ना-हरकत प्रमाणपत्र' दिले. त्यानुसार महाविद्यालयांनी जाहिरात प्रसिद्ध केल्या. मात्र, त्यानंतरही ही प्रक्रिया कासव गतीनेच सुरू आहे. त्यामुळे नेमकी भरती कधी होणार, असा प्रश्‍न उमेदवार उपस्थित करीत आहेत. याबाबत उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

'प्राध्यापक भरतीप्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्याप्रमाणे ही प्रक्रिया सुरू झालेली नाही. आतापर्यंत केवळ 40 टक्के जागांवरील भरतीप्रक्रिया जाहीर केली आहे. उर्वरित जागांच्या भरतीबाबत अद्याप शंका उपस्थित होत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत सेट-नेट परीक्षेचे अनेक निकाल लागले. हजारो उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि आता ते भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त असूनही प्राध्यापक भरतीबाबत दिरंगाई केली जात आहे.''
- सुरेश देवढे पाटील (सेट, नेट, पीएचडी संघर्ष समिती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com