प्रकल्प वेळेत पूर्ण करा - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने कोणतेही नवीन प्रकल्प हाती न घेता सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने कोणतेही नवीन प्रकल्प हाती न घेता सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मेट्रो शहरांमध्ये मेट्रो, मोनो रेल, रस्तेरुंदीकरण आणि रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागांत जलसिंचन आणि रस्त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री नियमित घेत असतात. हे प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यासाठी त्यांनी "वॉर रूम टीम' स्थापन केली आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण झाल्यास सरकारला फायदा होईल, त्यामुळे लोकांच्या नजरेत भरू शकणारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील मेट्रो, मोनो रेल प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प 40 टक्‍के पूर्ण झाला आहे. मुंबईसाठी वाहतुकीचे प्रकल्प खूप महत्त्वाचे आहेत. मेट्रो प्रकल्प तातडीने पूर्ण होणार नाही; मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, या दृष्टीने त्याचे काम होईल. एखादा प्रकल्प पूर्ण होण्याबाबत लोकांना वाटणाऱ्या विश्‍वासाचाही फायदा सत्ताधाऱ्यांना होतो, त्यामुळे लवकरच हे प्रकल्प अधिक गती घेतील, असा विश्‍वासही या अधिकाऱ्याने व्यक्‍त केला.

ग्रामीण भागांमध्ये जलयुक्‍त शिवार अभियानाने सकारात्मक वातावरण निर्माण केल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री कार्यालयाला वाटत आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेचाही फायदा व्हावा, यासाठी या योजनेतील त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचनाही या कार्यालयाने संबंधितांना केल्या आहेत.

Web Title: project complete devendra fadnavis politics