प्रकल्प संचालक गणेश चौधरी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019


नगर ः अमरावतीतील केम प्रकल्पामध्ये तब्बल सहा कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरींविरुद्ध अडीच महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सध्या ते नगर जिल्हा ग्रामीण यंत्रणेत प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत.

नगर ः अमरावतीतील केम प्रकल्पामध्ये तब्बल सहा कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरींविरुद्ध अडीच महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सध्या ते नगर जिल्हा ग्रामीण यंत्रणेत प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत.

चौधरी हे अमरावतीमध्ये येथील केम प्रकल्पात 2016-17मध्ये प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. या वर्षात त्यांनी आपल्या परिचित व्यक्तींच्या नावे असलेल्या कंपन्यांना कामे देऊन सहा कोटी रुपयांची अफरातफर केल्या प्रकरणी लेखापरीक्षक दिगंबर नेमाडे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ते जामिनावर असल्याने त्यांची नगरला बदली झाली होती. परंतु या कामासाठी ते कायमच रजेवर राहत होते. जामिनाची मुदत संपल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.

काय आहे प्रकरण
शेतकरी आत्मत्येस प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने केम प्रकल्प उभारला आहे. त्याअंतर्गत शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण व भांडवलनिर्मिती करून देण्याकरिता समन्वयीत कृषी प्रकल्प योजना राबविली होती. या केम प्रकल्पात 2016-17 दरम्यान तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी सहा कोटी रुपयांची अफरातफर केल्या प्रकरणी लेखपरीक्षक दिगंबर नेमाडे यांनी गाडगेनगर (अमरावती) पोलिस ठाण्यात दोन जुलै 2019 ला गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात प्रकल्पाच्या माध्यमातून सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पशुधन विकास कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठीही पुण्यातील तीन कंपन्यांना कंत्राट दिले होते. पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा सखोल तपास केला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोनजणांना आधीच अटक केली होती.

या गुन्ह्यात गणेश चौधरींचादेखील मोठा सहभाग असल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पथक चौधरी यांच्या मागावर होते. मात्र चौधरी यांनी अमरावतीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अंतरिम जमीन मंजूर केला असल्याने त्यांना अटक झाली नव्हती. मात्र, जामिनाची मुदत संपताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौधरी यांना ताब्यात घेतले.

जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना सुरवातीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यानंतर पुन्हा न्यालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, केम प्रकल्प प्रकरण उघड झाल्यानंतर गणेश चौधरी यांची नगरला प्रकल्प संचालक पदावर बदली झाली होती. चौधरी यांनी दोन महिन्यांपूर्वी नगरचा पदभार स्वीकारला होता.

या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने ते कायमच रजेवर होते. अटक होण्यापूर्वी चौधरी यांनी नगरला काही दिवस काम करून पुन्हा रजेवर गेले होते. त्यांना अटक झाल्यामुळे त्यांना शासनाने निलंबित केले आहे. या प्रकाराने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Project Director Ganesh Chaudhary suspended