सीएनजी वाहनांना आशादायी वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

promising environment for CNG vehicles alternative to petrol-diesel

सीएनजी वाहनांना आशादायी वातावरण

पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी (कम्प्रेस्ड नॅचरल गॅस) वाहनांची भारतीय बाजारातील लोकप्रियताही कमी झालेली नाही. परवडणाऱ्या किमतीबरोबरच ही वाहने चांगले मायलेजही देतात. नियमित दुरुस्ती खर्चही आवाक्यात.

त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सीएनजीची क्रेझ अजूनही कायम असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांसमोर सध्या जसे चार्जिंग स्टेशनचे आव्हान आहे, तसेच आव्हान काही वर्षांपूर्वी सीएनजी पंपांचे होते; परंतु या आव्हानावर मात करत सीएनजी पेट्रोल-डिझेलला एक सक्षम पर्याय म्हणून समोर आला आहे.

कोरोनानंतरच्या काळात वाहन उद्योगाने भारतीय बाजारात चांगली पकड बनवली आहे. त्याचबरोबरीने कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने स्वच्छ इंधनाचे पर्याय शोधण्यास वाहन कंपन्यांनी सुरुवात केली. इलेक्ट्रिक वाहनांना भविष्यात पूरक वातावरण असताना सीएनजी वाहनेही कार्बन उत्सर्जन नियंत्रित करण्याच्या मोहिमेला पाठबळ देत आहेत.

गेल्या काही वर्षात कार विक्रीच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास पेट्रोल-डिझेल वाहनांच्या बरोबरीने सीएनजी वाहनांची विक्री होत आहे. एकूणच गैरसमज दूर झाल्याने आणि फायद्यांची जाणीव झाल्याने सीएनजी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे ‘टाटा मोटर्स’ प्रवासी वाहन विभागाचे उपाध्यक्ष मोहन सावरकर यांनी सांगितले.

जागतिक स्तरावर भारत सीएनजीसाठी मोठी बाजारपेठ बनले आहे. गेल्या दशकभरात नैसर्गिक वायूची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाना, दिल्ली या ‘टायर १’ शहरांत जवळपास ८५ टक्के सीएनजी प्रवासी वाहने धावतात.

सीएनजी पाईपलाईनचे ठिकठिकाणी जाळे पसरल्याने टायर-२ शहरांमध्येही सीएनजी वाहनांना पूरक वातावरण आहे. २०१५ या वर्षापर्यंत ‘सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन’ची (सीजीडी) भौगोलिक व्याप्ती ७ टक्के होती, ती आता २०२२पर्यंत ८६ टक्क्यांवर (२८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ६०० शहरे) आली आहे.

भारतातील नामांकित कार कंपन्या या वाढलेल्या लोकप्रियतेची दखल घेऊन सीएनजी वाहने बाजारात दाखल करीत आहेत. एकट्या २०२२ या वर्षात सीएनजी प्रवासी वाहनांची विक्री ५५ टक्क्यांनी वाढली. २०१३ मध्ये हेच प्रमाण ६.३ टक्के होते.

सध्या बाजारात १६ विविध प्रकारच्या कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये येतात. या वाहनांचा बाजारातील सरासरी विक्रीचे प्रमाण ११ टक्के आहे. सीएनजी वाहनांमधील वैविध्यता, नवीन शोध ग्राहकांच्या मनातील शंका दूर करत असल्याने हे निर्णायक बदल सीएनजी वाहनांच्या विक्रीचा पुढील मार्ग अधिक सुकर करत आहेत.

गैरसमज दूर

सीएनजीच्या वापराबाबत यापूर्वी अनेक गैरसमज होते. हे इंधन असुरक्षित असल्याची भावना अनेकांच्या मनात होती; परंतु प्रत्यक्षात सीएनजीची साठवण्याची पद्धत, वाहनातील जागा यामुळे पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या वाहनांपेक्षा अधिक सुरक्षित आहे. शिवाय सीएनजी वाहन अधिक इंधन कार्यक्षम असते. पेट्रोल -डिझेलप्रमाणे अंतर्गत पाईप्समध्ये कोणताही वायू सोडत नाही आणि त्याचा देखभाल-दुरुस्ती खर्चही कमी करते. सीएनजी वाहन मालकासाठी परवडणारा ठरते.