राज्यात मेगा टेक्‍सटाईल पार्कचा प्रस्ताव 

Proposal of mega textile park in the state
Proposal of mega textile park in the state

मालेगाव : शेतीपाठोपाठ राज्यात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रमाग व्यवसायाला नवा आयाम देण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी मालेगावसह सोलापूर, भिवंडी व खामगाव या चारही ठिकाणी मेगा टेक्‍सटाईल पार्क सुरू करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. 

वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत शासनास प्रस्ताव सादर करावे, असे आदेश देण्यात आले. सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चून चार मेगा टेक्‍सटाईल पार्क सुरू झाल्यास रोजगारात वाढ होऊन पूरक व्यवसायांना व संबंधित शहरांच्या विकासाला चालना मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील इचलकरंजी व डोंबिवली येथे कापडावर प्रक्रिया करणारे टेक्‍सटाईल पार्क आहेत. यंत्रमाग व्यवसाय असलेल्या शहरांतच कापड निर्मिती व प्रक्रिया व्हावी, या हेतूने संबंधित शहरांत मेगा टेक्‍सटाईल पार्कचा प्रस्ताव आहे. या चारही शहरांत सध्या जुन्या यंत्रमागावरच कामकाज चालत असल्याने ती यंत्रमाग अत्याधुनिकीकरणाच्या बाबतीत पिछाडीवर आहेत. या चारही शहरांमध्ये कपड्यावर प्रक्रिया (प्रोसेस युनिट) करणारे उद्योग सुरू झाल्यास कापड निर्मितीच्या खर्चातही बचत होईल. 

टेक्‍सटाईल पार्कमध्ये कापडावर होणारी प्रक्रिया 
कापड निर्मितीपूर्वी : जिनिंग, स्पिनींग, सायजिंग, वार्पींग, सिंथेटिक यार्न असल्यास टेक्‍सटोराईजींग व वार्पींग 
कापड तयार झाल्यानंतर : डाइंग, प्रोसेसिंग, ब्लिचिंग, गारमेन्ट 

मेगा टेक्‍सटाईल पार्कची निर्मिती झाल्यास शहरातील यंत्रमाग व्यावसायिकांची मोठी सोय होईल. शहरात तयार झालेले कापड प्रोसेसिंगसाठी पाली, बालोत्रा येथे पाठवावे लागते. यामुळे वाहतूक खर्चात वाढ होते. पर्यायाने कापड निर्मिती खर्च वाढतो. शहरातच प्रोसेसिंग युनिट सुरू झाल्यास, यंत्रमाग व्यवसायाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. व्यवसायाच्या अत्याधुनिकीकरणास हातभार लागेल. शहरात आर्थिकदृष्ट्या सक्षम असे अनेक यंत्रमाग व्यावसायिक आहेत. त्यांना टेक्‍सटाईल पार्क करणे शक्‍य आहे. त्याशिवाय शासनाचे अनुदानही मिळणार आहे. 
- आसिफ शेख, आमदार, मालेगाव मध्य. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com