फिटनेससाठी 'प्रोटिन बार'ला तुफान मागणी; बाजारपेठ २०० कोटींवर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 मे 2019

केवळ भूक भागविण्याऐवजी शरीरातील पोषणमूल्ये वाढविणारे खाद्यपदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. चॉकलेट्‌स, फास्ट फूड, जंक फूडऐवजी बाजारात ‘प्रोटीन आणि न्युट्रिशन बार’ची मागणी झपाट्याने वाढत असून, ही बाजारपेठ २०० कोटींच्या पुढे गेली आहे.

मुंबई - केवळ भूक भागविण्याऐवजी शरीरातील पोषणमूल्ये वाढविणारे खाद्यपदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. चॉकलेट्‌स, फास्ट फूड, जंक फूडऐवजी बाजारात ‘प्रोटीन आणि न्युट्रिशन बार’ची मागणी झपाट्याने वाढत असून, ही बाजारपेठ २०० कोटींच्या पुढे गेली आहे. तरुणाईमध्ये फिटनेसबाबत असलेली जागरूकता, दरडोई उत्पन्नातील वाढ, आहारतज्ज्ञांचा सल्ला, पौष्टिक आणि सात्त्विक खाद्यपदार्थांकडे भारतीयांचा वाढता कल आदींमुळे नजीकच्या काळात ही बाजारपेठ एक हजार कोटींचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज आहे.

प्रथिनांचे मिश्रण असलेल्या ‘प्रोटीन आणि न्युट्रिशन बार’मुळे एखादी व्यक्ती किमान चार तास ताजातवानी राहू शकते, असे ‘नॅचरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय उत्तरवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, भूक लागल्यावर भारतीय लोक बहुतांशवेळा कमी पोषणमूल्ये असणारे पदार्थ खातात. जंक फूडमुळे स्थूलपणा, मधुमेह यांसारखे आजार जडतात. अनेकदा भोजनात पोषणमूल्यांची कमतरता असल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते. आवश्‍यक प्रथिनांची गरज भागविण्यासाठी ‘नॅचरल’ने १२ वर्षांपूर्वी प्रोटीन बारची संकल्पना विकसित केली. ‘राइटबाइट प्रोटीन बार’ आणि ‘न्युट्रिशन बार’ या दोन उत्पादनांमध्ये किनुआ, ज्वारी, ओट्‌स, उडद आणि विविध डाळींसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांबरोबर बदाम, बेरी, चॉको या फळांचा समावेश आहे. नाश्‍ता किंवा जेवणाची भूक भागविण्याची क्षमता प्रोटीन आणि न्युट्रिशन बारमध्ये असल्याचा दावा उत्तरवार यांनी केला. न्युट्रिशन, प्रोटीन यांचा शरीरातील समतोल राखण्यासाठी पौष्टिक आहार आवश्‍यक आहे. त्यासाठी कंपनीने प्रथमच ‘प्रोटीन चिप्स’ची निर्मिती केली आहे, असे त्यांनी सांगितले.

‘प्रोटीन बार’च्या बाजारपेठेत ‘नॅचरल’कडून दरमहा १० लाख प्रोटीन बारची विक्री केली जाते. भारतात प्रोटीन बारची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत प्रोटीन आणि न्युट्रिशन बारची बाजारपेठ एक हजार कोटींपर्यंत वाढेल, असा विश्‍वास उत्तरवार यांनी व्यक्त केला. स्थानिक उत्पादनामुळे परदेशी कंपन्यांच्या तुलनेत नॅचरलची उत्पादने स्वस्त आहेत. प्रमुख शहरांमध्ये या उत्पादनांना मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रोटीन बारची भारतीय बाजारपेठ 
  उलाढाल : २०० कोटी 
  कंपन्या : २२ कंपन्यांची उत्पादने
  वार्षिक वृद्धी दर : २५ ते ३० टक्के
  पुढील पाच वर्षांत : एक हजार कोटींची उलाढाल

Web Title: Protein bar market at 200 crores