दुष्काळग्रस्तांसाठी पुरेसा निधी देणार : मुख्यमंत्री

दुष्काळग्रस्तांसाठी पुरेसा निधी देणार : मुख्यमंत्री

जालना : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

मुख्यमंत्र्यांचा शनिवारी जिल्ह्यात दुष्काळी दौरा होता. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मंठा तालुक्‍यातील दोन महसूल मंडळे व अन्य सात तालुक्‍यांत दुष्काळी परिस्थिती आहे, अशी माहिती देत मुख्यमंत्री म्हणाले, की 971 गावांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पैसेवारी आहे. 27 मध्यम प्रकल्प कोरडे, तर सात प्रकल्पांतील पाण्याची स्थिती गंभीर आहे. जिल्हा प्रशासनाच्या पाणीटंचाई आराखड्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. 

मनरेगाची कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मजुरांना 15 दिवसांच्या आत मजुरी देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. डिसेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन चारा निर्मिती केली जाईल. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व जमीन महसुलात सूट देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय वाढीव नोंद झालेल्या शेततळ्यांना मंजुरी, वाळूमाफिया व अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची उपस्थिती होती. 

प्रकल्पाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना 

ड्रायपोर्ट, सीडपार्क, आयसीटी या प्रकल्पांचा आढावा घेतला, सीडपार्कच्या कामात अद्याप प्रगती नाही. त्यामुळे सोमवारी (ता. पाच) मंत्रालयात याबाबत बैठक ठेवण्यात आली असून, या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेसह अन्य बाबींचाही आढावा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com