फडणवीस सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 17 जून 2019

शेतकऱ्यांची लूटमार सुरू - अजित पवार 
पीककर्ज घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर झालेली कर्जमाफी मिळणे तर दूरच, उलट शेतकऱ्यांना १२ ते १३ टक्के दराने व्याज आकारून त्यांची लूटमार सुरू आहे. दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्‍य झाले नाही, त्यांना कर्जमाफी मिळणे आवश्‍यक होते. कर्जमाफी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, हे याच सरकारचे पाप आहे, अशी टीका विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.

मुंबई  - भाजप- शिवसेना सरकारने पाच वर्षांत काहीही ठोस काम केले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाचे बिगुल वाजवले. सर्वच क्षेत्रांत जनतेचा अपेक्षाभंग करणाऱ्या युती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर अपेक्षेप्रमाणे बहिष्कार टाकला. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी सरकारच्या पाच वर्षांतील कारभाराचा लेखाजोखा मांडत विधिमंडळ अधिवेशनात सरकारची कोंडी करणारे मुद्दे उपस्थित केले जातील, अशी घोषणा विरोधकांनी केली. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, की १७ जून हा ‘दुष्काळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, या प्रश्‍नावर सरकारला धारेवर धरण्यात येईल. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये देण्याची मागणी या अधिवेशनातही लावून धरण्यात येईल. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा फक्त आभास निर्माण करण्यात आला होता, असेही मुंडे म्हणाले. १२०० कोटी रुपयांच्या एफएसआय गैरव्यवहारप्रकरणी प्रकाश महेता यांना केवळ मंत्रिमंडळातून काढून काहीही होणार नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

राज्याला हवा स्वतंत्र गृहमंत्री

  • राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे
  • पानसरे, दाभोळकर यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत
  • मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा
  • ‘गृहनिर्माण’ बनले भ्रष्टाचाराचे कुरण
  • हे बिल्डर धार्जिणे सरकार आहे
  • दुष्काळ व बेरोजगारीबाबत सरकारला जाब विचारणार
  • सोळा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार

काही मंत्र्यांना आज मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दीड डझन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी काढायला हवे होते. 
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Disappointment by Fadnavis Government