हवालदिल जनतेला ‘जलयुक्‍त’चा आधार

Jalyukta-Shivar
Jalyukta-Shivar

पुणे - राज्यातील ग्रामीण जनतेला सध्या दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. तथापि चार वर्षांत लोकसहभागातून १६ हजारांहून अधिक गावांमध्ये ‘जलयुक्‍त शिवार’ची कामे करण्यात आली. त्यामुळे सध्या दुष्काळात हवालदिल जनतेला ‘जलयुक्‍त शिवार’चा काही प्रमाणात का होईना आधार मिळाला आहे. दरम्यान, जलयुक्‍त शिवार अभियानामुळे यंदाच्या दुष्काळाची दाहकता कमी झाली आहे, असा दावा जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलतानाही केला.

राज्यात २०१४-१५ या वर्षात १८८ तालुक्‍यांमधील नागरिकांना दुष्काळग्रस्त स्थितीला सामोरे जावे लागले होते. अपुऱ्या पावसामुळे भूजल पातळी दोन ते तीन मीटरने खोल गेली होती. त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत टंचाईग्रस्त गावांमध्ये मृद आणि जलसंधारणाची कामे सुरू केली होती. राज्यात २०१८-१९ या वर्षात १५१ तालुक्‍यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. तसेच, यंदा २४१ तालुक्‍यांमधील भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत एक मीटरपेक्षा जास्त घट झालेली आहे. उर्वरित ११२ तालुक्‍यांमध्ये सरासरी किंवा त्यावर भूजल पातळी असल्याचे ‘भूजल सर्वेक्षण’च्या अहवालात नमूद केले आहे.   

ग्रामीण भागात साखळी सिमेंट नाला बांध, लोकसहभागातून जलस्त्रोतातील गाळ काढणे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. नद्या-नाल्यांतील गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्याची कामे करण्यात येत आहेत. मृद संधारण विभाग, जिल्हा नियोजन विकास समिती, खासदार-आमदार निधी, उद्योगांकडील सामाजिक बांधिलकी (सीएसआर) निधीतून ही कामे सुरू आहेत. त्यांच्यावर चार वर्षांत आठ हजार कोटींहून अधिक खर्च झाल्याची माहिती जलसंधारण विभागातील सूत्रांनी दिली.

जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत झालेली कामे
वर्ष                    गावे           खर्च (कोटींमध्ये)                सिंचन क्षमता

२०१५-१६         ६२०२         तीन हजार ९००                 १४.८४ लाख हेक्‍टर
२०१६-१७         ५२८८         तीन हजार १९                    १२.९६ लाख हेक्‍टर
२०१७-१८         ५०२८          एक हजार १३६                   ६.४३ लाख हेक्‍टर
२०१८-१९         ६०७४         ८३.३८ कोटी (आजअखेर)     कामे प्रगतिपथावर

जलयुक्‍त शिवारसाठी निवडलेली गावे (चार वर्षांत) - २२ हजार ५९२ गावे
आजअखेर स्थिती -

१०० टक्‍के कामे पूर्ण झालेली गावे - १५,४६०
८० टक्‍के पूर्ण झालेली गावे - ८२१
५० टक्‍के झालेली गावे - ४१०
३० टक्‍के पूर्ण झालेली गावे - ५८४
३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी गावे - २,९२२
अद्याप कामे सुरू न झालेली गावे - २,३९५
 
यंदा पावसाचे प्रमाण तुलनेत कमी आहे. तरीही खरीप पिकांच्या क्षेत्रातील उत्पादकता टिकून आहे. जलयुक्‍त शिवारची कामे झाली नसती, तर यंदाच्या दुष्काळाची दाहकता आणखी तीव्र झाली असती. जलयुक्‍त शिवारच्या कामांमुळे दुष्काळाच्या परिस्थितीत अजूनही आपण तग धरून आहोत.
- ज्ञानेश्‍वर बोटे, सहसंचालक, मृद व जलसंधारण विभाग  

दुष्काळावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत आणि तज्ज्ञांना काय वाटते? वाचा ‘संडे स्पेशल’मध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com