"पुलं'कित वातावरणात रंगले खुमासदार किस्से 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पुणे - अवघे पंचाण्णव वर्षे पार केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि नव्वदी ओलांडलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी सांगितलेले खुमासदार किस्से...अन्‌ अभिनेत्री मुक्ता बर्वे हिनं सांगितलेलं "पुलं'चं आपल्या आयुष्यातील स्थान, अशा "पुलंकित' वातावरणात गुरुवारी "पुलोत्सवा'चा उद्‌घाटनाचा सोहळा झाला. 

आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन इव्हेंट्‌स अँड मीडिया यांच्यातर्फे आयोजित "पुलोत्सवा'चे उद्‌घाटन पुरंदरे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रा. मिरासदार यांना पुरंदरे यांच्या हस्ते "पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले; तर मुक्ता हिला "पुलं तरुणाई सन्मान' प्रदान करण्यात आला. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पुरंदरे, मिरासदार व बर्वे यांच्याशी साधलेल्या दिलखुलास संवादाने कार्यक्रमात रंगत निर्माण केली. संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, सुप्रिया चित्राव उपस्थित होते. 
 
"पुलं'समवेत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगत पुरंदरे यांनी त्या आठवणींना उजाळा दिला. आचार्य अत्रे यांचे विनोद लोकांना आवडत असले तरी, "पुलं'च्या विनोदाने कधी सुसंस्कृततेची पातळी ओलांडली नाही, असे सांगत मिरासदार यांनीही "पुलं'सोबतच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, """पुलं'चे विनोदातील स्थान आजही श्रेष्ठ आहे. विनोदी, मिश्‍कील अशा "पुलं'चे सामाजिक भानही प्रचंड होते.'' 

मुक्ता म्हणाली, """पुलं'चे साहित्य या उत्तम खुराकावरच माझे बालपण पोसले गेले. वय वाढत गेले, तसे पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आणि त्यांच्या सामाजिक कार्याची महती समजली आणि "पुलं' अधिकाधिक उलगडत गेले. माझे वाचन खूप नसले तरी चांगल्या साहित्याचे वाचन जरूर केले आहे. अभिनय उपजत असावा लागतो, हे खरं असलं तरी शिक्षणाने त्याला आकार येतो.'' 

Web Title: pulostav 2016