लाच प्रकरणात पुणे विभाग अव्वल

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

- महसूल' प्रथम,
- पोलिस' दुसऱ्या स्थानावर
- यंदा 881 प्रकरणांत 3.44 कोटी जप्त

सोलापूर : भ्रष्टाचारमुक्‍त भारत अथवा महाराष्ट्र अशी घोषणा सरकारने केली; परंतु सर्वसामान्यांशी संबंधित असलेल्या महसूल आणि पोलिस विभागात मागील चार वर्षांत सर्वाधिक लाच प्रकरणे घडल्याचे समोर आले आहे. लाच प्रकरणात मागील चार वर्षांत पुणे विभाग सातत्याने राज्यात अव्वल असून, दुसऱ्या स्थानावर नाशिक तर तिसऱ्या क्रमांकावर नागपूर विभाग आहे. यंदा राज्यात 926 लाच प्रकरणांमध्ये तीन कोटी 44 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या गरजा भागविणारा विभाग म्हणजे महसूल होय. मात्र, या विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड वाढतच आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांच्या सुरक्षेची अन्‌ समाजातील शांततेची जबाबदारी असलेला पोलिस विभाग दुसऱ्या स्थानावर आहे. 2015 ते 2018 या कालावधीत महसूल विभागात 958, तर पोलिस विभागात 869 लाचेची प्रकरणे घडली आहेत. त्यापाठोपाठ पंचायत समिती, महापालिका, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग यांचा क्रमांक लागतो. लाच प्रकरणांमध्ये मागील चार वर्षांत पुणे विभाग (801), नाशिक (606), नागपूर (580), औरंगाबाद (560), ठाणे (507), अमरावती (442), नांदेड (409) आणि मुंबई (231) अशी नोंद राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंध खत्याकडे आहे.

काही रकमेची अपेक्षा ठेवत सर्वसामान्यांची कामे अडवून ठेवणाऱ्यांची संख्या महसूल आणि पोलिस खात्यात अधिक दिसून येतात. मागील चार-पाच वर्षांत लाच प्रकरणांमध्ये महसूल आणि पोलिस हे दोन विभाग आघाडीवर आहेत. नागरिकांनी कोणालाही लाच देऊ नये, त्याबाबत आमच्याकडे तक्रारी कराव्यात. - अरुण देवकर, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर

मागील चार वर्षांतील स्थिती 
2015
लाच प्रकरणे- 1279
जप्त रक्‍कम- 2.47 कोटी 

2016
लाच प्रकरणे -1016 
जप्त रक्‍कम -2.68 कोटी 

2017
लाच प्रकरणे - 925 
जप्त रक्‍कम - 2.21 कोटी 

2018 
लाच प्रकरणे - 926 
जप्त रक्‍कम- 3.44 कोटी

Web Title: Pune division top in bribe cases