राज्यात 56 लाख हेक्‍टर क्षेत्रावर 40 टक्के पेरणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पुणे - राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी असले, तरी 21 जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तसेच राज्यात ऊस वगळता खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 139.64 लाख हेक्‍टर असून, आत्तापर्यंत 56.21 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (40 टक्के) पेरणी झाली आहे. त्यात पुणे विभागात खरीप पिकाखालील सरासरी 7.39 लाख क्षेत्रापैकी 1.99 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (27 टक्के ) पेरणी झाली आहे, असे राज्याच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यात खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. राज्यात जून 1 ते 30 जून कालावधीचा सरासरी पाऊस 223.3 मिमी झाला असून, 30 जूनपर्यंत 218.5 मिमी म्हणजेच सरासरीच्या 97.9 टक्के पाऊस झाला आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी काही विभागांत पावसाची शक्‍यता आहे. राज्यात ऊस पिकासह सरासरी क्षेत्र 149.42 लाख हेक्‍टर असून, 56.30 लाख हेक्‍टर क्षेत्रावर 38 टक्के पेरणी/ लागवड झाली असल्याचा अहवाल कृषी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कृषी विभागाच्या पर्जन्यमान आणि पेरणी अहवालानुसार, पुणे विभागात 1 जून ते 30 जून या कालावधीत हलक्‍या व मध्यम पावसाची नोंद झाली आहे. विभागात 30 जूनपर्यंत पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत एकूण 39 तालुक्‍यांपैकी 3 तालुक्‍यांत 75 ते 100 टक्के, तर 30 तालुक्‍यात 100 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तसेच विभागात भुईमूग पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. विभागत खरीप पिकांच्या पेरणीस सुरवात झाली असून, पुणे जिल्ह्यात 5 हजार 80 हेक्‍टर क्षेत्रावर भात रोपवाटिकेची, तर 280 हेक्‍टर क्षेत्रावर नाचणी रोपवाटिकेची कामे झाली आहेत.

विदर्भामध्ये दुबार पेरणीचे संकट
कृषी विभागाच्या अहवालानुसार, 21 जिल्ह्यांत 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांचा समावेश आहे. सरासरीच्या तुलनेत सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, अकोला, वर्धा या जिल्ह्यांमध्ये 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे, तर कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात 25 ते 50 टक्के पाऊस झाल्यामुळे विदर्भात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

Web Title: pune maharashtra news 40 percent sowing in state