बारावीचा निकाल 89.50 टक्के

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुलींचीच बाजी; विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळणार नऊ तारखेला

मुलींचीच बाजी; विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळणार नऊ तारखेला
पुणे - बारावीच्या निकालाची गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना असलेली धास्ती आजअखेर संपली. बारावीचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या निकालात यंदा 2.90 टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रिका नऊ तारखेला दुपारी तीन वाजता त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांतून मिळणार आहेत. नऊ विभागीय मंडळात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 95.20 टक्के आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर कोल्हापूर आहे. या विभागाचा निकाल 91.40 टक्के आहे, तर सर्वांत कमी निकाल मुंबईचा 88.21 टक्के लागला आहे.

बारावीच्या परीक्षेला यंदा 14 लाख 29 हजार 478 विद्यार्थी बसले होते. त्यातील 12 लाख 79 हजार 406 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे मुलींची सरासरी संख्या अधिक आहे. उत्तीर्ण मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा 6.40 टक्के अधिक आहे.

बारावीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होत असल्याने परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, ती गेल्या वर्षीपेक्षा एक लाख सात हजाराने अधिक आहे. त्यामुळे यंदाचा निकालही वाढल्याचे निरीक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.

अपंगांचीही बाजी
दृष्टिहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, सिकलसेल, थॅलेसेमिया, कर्णबधिर आदी अपंगत्व असलेल्या पाच हजार 620 विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली. त्यातील 93.01 टक्के म्हणजे पाच हजार 227 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी 72 हजार हजार 926 जणांनी पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) म्हणून परीक्षा दिली. यातील 40.83 टक्के म्हणजेच 29 हजार 779 जण उत्तीर्ण झाले आहेत.

मराठीचा निकाल 96 टक्के
राज्य शिक्षण मंडळाने एकूण 162 विषयांची परीक्षा घेतली. यातील 11 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे; परंतु हे विषय दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12 ते 100 यादरम्यान आहे. मराठी विषयाचा निकाल 96.92, इंग्रजीचा 90.33 आणि हिंदी भाषेचा 96.66 टक्के लागला आहे. खासगीरित्या म्हणजेच सतरा क्रमांकाचा अर्ज भरून 49 हजार 354 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांचा निकाल 68.46 टक्के आहे.

पेपरफुटीचा निकालावर फारसा परिणाम झालेला नाही, असे सांगताना म्हमाणे म्हणाले, 'परीक्षा उशिरा सुरू झाल्याने या वेळी पाच दिवस उशिरा निकाल लागला. विरारमधील एका शाळेतील कर्मचाऱ्यांनी संगनमत केल्याने पेपरफुटी झाली. त्यांना अटक झालेली असून, शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच परीक्षा सुरू झाल्यानंतर साडेअकरापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळेही काही ठिकाणी गैरप्रकार घडले. त्यामुळे साडेअकरापर्यंत विद्यार्थ्यांना येण्याची परवानगी देण्याबाबत फेरविचार केला जाणार आहे.''

पुणे विभाग तिसऱ्या स्थानावर
बारावीच्या निकालात पुणे विभाग तिसऱ्या स्थानावर आहे. या विभागाचा निकाल 91.16 टक्के लागला आहे. पुणे विभागात पुणे, नगर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागातून दोन लाख 30 हजार 871 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील दोन लाख 10 हजार 458 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: pune maharashtra news hsc result 89.50%