राज्यात मॉन्सून सक्रिय होण्याची प्रतीक्षाच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

पुणे - कोकणानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत गेल्या तीन दिवसांपासून मुक्काम ठोकलेल्या नैऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) शुक्रवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली.

पुणे - कोकणानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत गेल्या तीन दिवसांपासून मुक्काम ठोकलेल्या नैऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) शुक्रवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली.

राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यासाठी पुढील दोन ते तीन दिवसांची वाट पाहावी लागणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. दरम्यान, पुढील दोन दिवसांमध्ये कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

अर्धे राज्य व्यापणाऱ्या मॉन्सूनला पुढे जाण्यासाठी सध्या पोषक वातावरण नाही. राजस्थानपासून ते उत्तर प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मॉन्सूनने काही भागात प्रगती केली. पुढील प्रगतीसाठी अजून तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये वाहणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यांना पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असून येत्या सोमवारनंतर (ता. 18) मॉन्सून सक्रिय होईल, असेही सांगण्यात आले.

राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस
मध्य महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. नगरमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यात अद्याप पावसाची प्रतीक्षा असून उस्मानाबाद येथे पाच मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भात पावसाची नोंद झाली नसल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

शहर .... पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
पुणे ...... 28.6
सातारा .... 27
कोल्हापूर .... 8
नगर .......... 7
रत्नागिरी ..... 6
सांगली ....... 1
उस्मानाबाद ... 5

Web Title: pune maharashtra news monsoon