मॉन्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) सोमवारी अर्धा महाराष्ट्र व्यापला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मॉन्सूनने सलामी दिली असून, त्याची घोडदौड पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. मात्र, विदर्भात मॉन्सून बरसण्यासाठी पुढील दोन दिवसांची वाट बघावी लागेल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) सोमवारी अर्धा महाराष्ट्र व्यापला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मॉन्सूनने सलामी दिली असून, त्याची घोडदौड पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. मात्र, विदर्भात मॉन्सून बरसण्यासाठी पुढील दोन दिवसांची वाट बघावी लागेल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
केरळमध्ये वेळेआधी पोचलेला मॉन्सून महाराष्ट्रात कधी येणार याची उत्सुकता ताणली गेली होती. 8 जूनला मृगाच्या मुहूर्तावर दाखल होऊन त्याचे उत्तर मॉन्सूनने दिले; पण त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण नव्हते. त्यामुळे त्याचा प्रवास संथ गतीने झाला. आता अरबी समुद्रात किनारपट्टीच्या समांतर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकणातून महाबळेश्‍वर आणि त्यापुढे पुणे, मुंबई, नाशिक, मराठवाड्याचा काही भागापर्यंतचा प्रवास मॉन्सूनने अवघ्या एका दिवसात पूर्ण केला. त्यातून अर्धा महाराष्ट्र मॉन्सूनने व्यापला असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मॉन्सूनचा जोर पुढील 38 तासांमध्ये वाढणार आहे. त्यामुळे या भागात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडतील, असेही हवामान खात्याने सांगितले आहे.

महाराष्ट्रात पुढील 38 तासांमध्ये मॉन्सून सक्रिय राहील. त्यासाठी आवश्‍यक वातावरण अरबी समुद्र आणि कोकणात आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात मॉन्सून बरसण्यासाठी अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर मॉन्सून विदर्भात पोचेल. या दरम्यान, तेथे पूर्वमोसमी पाऊस पडेल, असेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव म्हणाले, 'केरळात मॉन्सून दोन दिवस आधी पोचला. याचदरम्यान मोरा चक्रीवादळ आले. त्यामुळे मॉन्सूनच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण झाला. तसेच, त्यातून केरळपर्यंत आलेल्या मॉन्सूनला अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा की जो पुढे ओमानच्या दिशेने गेला. त्याचा अडथळा आला. त्यामुळे केरळमध्ये तो बराच वेळ रेंगाळला. आता मॉन्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पुढील 38 तास मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडेल.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune maharashtra news monsoon in maharashtra