निम्मा महाराष्ट्र चाळिशीपार ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

परभणी 42, वर्धा 41.9, ब्रह्मपुरी - 41.8, तर सोलापूर 41.3 अंशांवर 
पुणे - उन्हाच्या चटक्‍यांनी अर्धा महाराष्ट्र होरपळत आहे. मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने उसळी मारली असून, उत्तर मध्य महाराष्ट्रातही तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. राज्यात सर्वांत जास्त तापमान परभणी येथे 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअस नोंदवला गेला. 

परभणी 42, वर्धा 41.9, ब्रह्मपुरी - 41.8, तर सोलापूर 41.3 अंशांवर 
पुणे - उन्हाच्या चटक्‍यांनी अर्धा महाराष्ट्र होरपळत आहे. मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने उसळी मारली असून, उत्तर मध्य महाराष्ट्रातही तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. राज्यात सर्वांत जास्त तापमान परभणी येथे 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअस नोंदवला गेला. 

कोरड्या वाऱ्याचा प्रभाव 
उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात विशेषत- मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवसांमध्ये उष्णतेची लाट येईल, असा इशाराही हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

मार्चच्या अखेरीला उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे एप्रिलमध्येही उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. कमाल तापमानामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्रीचा उकाडा असे वातावरण सध्या दिसत आहे. 

राज्यात नोंदवल्या गेलेल्या 26 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती, तर चार जिल्ह्यांमध्ये 39 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले होते. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी 30 आणि 31 मार्चला उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागांत आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. शिवाय विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या चार दिवसांमध्ये गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता विभागाने वर्तविली आहे. 

मध्य महाराष्ट्र 
पुण्यात 37, तर लोहगाव येथे 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत उष्णतेचा चटका वाढला होता. 

उत्तर महाराष्ट्र 
जळगाव, नाशिक आणि मालेगाव येथील तापमान वाढले आहे. 

विदर्भ 
विदर्भातील 12 जिल्ह्यांतील कमाल तापमानाची नोंद हवामान खात्यात झाली. त्यापैकी सहा जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. अमरावती आणि गोंदिया येथे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

तापमानाची चाळिशी ओलांडलेले जिल्हे 
(सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये) 

- अकोला - 41.5 
- चंद्रपूर - 41.2 
- जळगाव - 41 
- मालेगाव - 41 
- यवतमाळ - 41 
- नागपूर - 40.9 
- नगर - 40.2 
- नांदेड - 40 

देशातील चाळिशीच्या पुढील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 
- अहमदाबाद - 40.5 
- बडोदा - 40.7 
- कर्नूल - 40.6 
- राजकोट - 40.6 
- भूज - 40.4 
- गुलबर्गा - 40.3 
- बळ्ळारी - 40 

Web Title: pune maharashtra news summer temperature increase