शहरासह राज्यातून थंडी गायब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे - मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरासह राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीने काढता पाय घेतल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. शहरात पुढील दोन दिवस किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर राहणार असून, राज्यातही हवामान कोरडे राहील, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.

पुणे - मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरासह राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीने काढता पाय घेतल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. शहरात पुढील दोन दिवस किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर राहणार असून, राज्यातही हवामान कोरडे राहील, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.

दीवचा परिसर आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच हिंदी महासागर व बंगालचा उपसागर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्याच्या काही भागांवर झाला असून, पहाटे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. त्यामुळे पहाटे असलेल्या थंडीची तीव्रताही कमी झाली असून, गोव्यासह, संपूर्ण राज्यात काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
संक्रातीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे. या पुढे किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राच्या पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या काही भागांत ढगाळ हवामान होते. रविवारी (ता. 14) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे 9.7 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. येत्या शुक्रवार (ता. 18) पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही येत्या शनिवार (ता. 20) पर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहील.

कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत वाढ झाली. भिरा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी वाढ होऊन किमान तापमान 19 अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंशांनी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी वाढले असून, किमान तापमानाचा पारा 14.3 अंश सेल्सिअसवर होता. मराठवाड्यातील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी वाढ झाली आहे. नांदेडमध्ये 13.5 अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भातील बहुतांशी भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली. गोंदियापाठोपाठ नागपूर व चंद्रपूर येथे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.

रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये) मुंबई (सांताक्रूझ) 21.8 (5), अलिबाग 21.4 (4), रत्नागिरी 21.8 (3), भिरा 19.0 (3), डहाणू 21.3 (4), पुणे 15.6 (5), जळगाव 15.2 (3), कोल्हापूर 20.1 (5), महाबळेश्वर 16.8 (4), मालेगाव 18.2 (7), नाशिक 14.3 (4), सांगली 17.9 (4), सातारा 16.6 (4), सोलापूर 18.9 (3), औरंगाबाद 15.4 (4), परभणी शहर 14.5, नांदेड 13.5, अकोला 17.5 (3), अमरावती 16.8 (2), बुलडाणा 18.2 (4), चंद्रपूर 13.2 (-2), गोंदिया 9.7 (-4), नागपूर 13, वर्धा 15.5 (2), यवतमाळ 18 (3).

Web Title: pune maharashtra news temperature increase