राज्यातील महिला होतायंत लठ्‌ठ...

योगीराज प्रभुणे
बुधवार, 14 जून 2017

महाराष्ट्रात 16 टक्के नागरिक स्थूल
पुणे - प्रगत महाराष्ट्रात पुरुषांच्या तुलनेत लठ्ठ महिलांचे प्रमाण अधिक असून, त्यातून भविष्यातील पिढीचे आरोग्य धोक्‍यात येत आहे.

राज्यातील 16 टक्के जनतेमध्ये स्थूलता हा आजार असल्याचा निष्कर्ष "इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे.

महाराष्ट्रात 16 टक्के नागरिक स्थूल
पुणे - प्रगत महाराष्ट्रात पुरुषांच्या तुलनेत लठ्ठ महिलांचे प्रमाण अधिक असून, त्यातून भविष्यातील पिढीचे आरोग्य धोक्‍यात येत आहे.

राज्यातील 16 टक्के जनतेमध्ये स्थूलता हा आजार असल्याचा निष्कर्ष "इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे.

स्थूलता हा आजार असल्याचे वैद्यकशास्त्राने सिद्ध केले आहे. स्थूलता हा चयापचय क्रियेशी संबंधित आजार असला तरीही त्याचा दूरगामी परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे महिलांमधील वाढती स्थूलता ही आरोग्याच्या दृष्टीने धोक्‍याची घंटा असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

स्वातंत्र्योत्तर 70 वर्षांच्या काळात देशातील संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वेगाने कमी झाले आहे. संसर्गजन्य रोगांमधून होणारी गुंतागुंत आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. त्याच वेळी असंसर्गजन्य रोगांचे वाढते प्रमाण ही देशातील आरोग्य सेवेपुढचे मोठे आव्हान ठरत आहे. त्यात हृदयविकार, "सीओपीडी' (क्रॉनिक ऑबस्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज), कर्करोग, मानसिक आरोग्य याबरोबरच स्थूलता विकारांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 16 टक्के रुग्ण स्थूलतेच्या आजाराने ग्रस्थ असल्याची माहिती "इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च'मधून पुढे आली आहे. त्यापैकी 97.7 लाख महिला असून, पुरुषांचे प्रमाण 92 लाख आहे. महिलांमधील स्थूलता वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम पुढच्या पिढीवर होण्याचा धोका असतो, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. लठ्ठपणा टाळण्यासाठी किंवा त्यातून उद्‌भवणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी या आजारावरील शास्त्रीय उपचार आता उपलब्ध होत आहेत. त्यामुळे स्थूलता आजाराला प्रतिबंध करणे शक्‍य आहे, असा विश्‍वासही व्यक्त करण्यात येत आहे.

स्थूलतेचे गडद होणारे आव्हान
अमेरिका आणि चीन खालोखाल स्थूलतेत भारताचा क्रमांक असल्याचे लॅनसेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात नमूद केले आहे. त्यानंतर रशिया, ब्राझील आणि मेक्‍सिको या देशांचा समावेश झाल्याचेही या नियतकालिकात म्हटले आहे. त्यामुळे देशातील असंसर्गजन्य रोगांमध्ये स्थूलता सध्या सर्वांत गंभीर समस्या आहे.

उपचारांचा वाढता खर्च
स्थूलतेवर उपचार करणाऱ्या 50 टक्के रुग्णांना दरमहा पाच ते 20 हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे आजारातील पुढील गुंतागुंत टाळणे शक्‍य होते. भयंकर वजन वाढल्याने आणि मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी चार टक्के रुग्ण शस्त्रक्रिया करतात. त्याचा शस्त्रक्रियेचा खर्च लाखभर रुपयांचा घरात असतो.

'शालेय मुलींमध्ये स्थूलता ही ज्वलंत सामाजिक समस्या आहे. त्यावर वेळीच उपाय केले पाहिजे. पुढची सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी या मुलींचे आरोग्य चांगले असणे आवश्‍यक आहे,''
- डॉ. शशांक शहा, बॅरियाट्रिक सर्जन

Web Title: pune maharashtra news women fat in maharashtra