मॉन्सूनसाठी राज्यात पोषक वातावरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

मुसळधारेचा इशारा; नाशिक, लातूर, पुण्यात पावसाची हजेरी

मुसळधारेचा इशारा; नाशिक, लातूर, पुण्यात पावसाची हजेरी
पुणे - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) पोचण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्याच वेळी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी येत्या गुरुवारी (ता. 15) मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, लातूर, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली.

अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून कर्नाटक आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे; मात्र तो पाऊस पुढे येईल असा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र किंवा उत्तर भारतात तयार झालेला नाही. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत मॉन्सून दाखल होऊन दोन ते तीन दिवस झाल्यानंतरही तेथे अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

पुढील तीन ते चार दिवसांमध्ये गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा उर्वरित भाग आणि विदर्भाच्या काही भागांत मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. उत्तर प्रदेश आणि आसामच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच पाकिस्तान आणि वायव्य भारतातही चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्यातील तज्ज्ञांनी सांगितले. महाराष्ट्रात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर (ता. 8) दाखल झालेल्या मॉन्सूनने सोमवारी (ता. 12) अर्धा महाराष्ट्र व्यापला. गेल्या तीन दिवसांपासून त्यात कोणतीही प्रगती झाली नाही. त्यामुळे याच भागात त्याचा मुक्काम आजही कायम होता.

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी
राज्यातील कोकणात पाऊस कायम आहे. रत्नागिरी येथे 13 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, कणकवली येथे पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात लोहगाव येथे 56 मिलिमीटर पाऊस पडला. मालेगाव (6 मि.मी) आणि नाशिक (ता. 16) येथे पावसाच्या सरी पडल्या. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे 40 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला असला, तरीही इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला नाही.

राज्यातील पाऊस
लातूर : जिल्ह्यात पाऊस, चावरजा नदीला पाणी
नाशिक : चांदवड, वडाळीभोई परिसरात जोरदार पाऊस
सोलापूर : बार्शी परिसरात पाऊस; ओढ्यात सुमो वाहून गेली
नगर : तालुक्‍यात वीज पडून महिला ठार
पुणे : शहरात पावसाची जोरदार हजेरी

Web Title: pune maharashtra Nutritious atmosphere for monsoon in state