जेवण नाही, तर चहा देऊन झाला विवाह संपन्न!

अनविता श्रीवास्तव
रविवार, 30 डिसेंबर 2018

माझ्या समुदायात मी बघितले आहे की, मुलीच्या लग्नासाठी लोक आपली प्रॉपर्टी गहाण ठेवतात. "लोक काय म्हणतील' याचा ताण घेऊन भपकेदार विवाहसोहळ्यासाठी लोक प्रयत्न करतात. माझ्या मुलीचे लग्न चहाच्या पाहुणचारावर करून मला त्यांना साध्या लग्नपद्धतीचा स्वीकार करा, असा संदेश द्यायचा आहे. 

- झाईद शेख, सामाजिक कार्यकर्ते 

पुणे : लग्नसराई म्हटली की आई-वडिलांना करावा लागणारा मोठा खर्च ओघानेच आला. भारतीय संस्कृतीत आता हे एक फॅडच झाले आहे. पण याला फाटा देत एका बापाने आपल्या मुलीचे लग्न चक्क केवळ चहापानावर केले! या लग्नात ना चमचमीत पदार्थ प्रकार होते, ना काही गोडधोड... होता फक्त चहाचा पाहुणचार! 

लग्नामध्ये जेवणाऐवजी चहापान, यावर तुमचा विश्‍वास बसतोय का? पण हे खरंच घडले आहे. "चाय पर शादी' या अनोख्या पद्धतीने कोंढव्यातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते झाईद शेख यांनी आपल्या मुलीचा लग्नसोहळा नुकताच केला. हा लग्नसोहळा अगदी साध्या पद्धतीने सहाशे लोकांच्या उपस्थितीत झाला. "बीग फॅट वेडींग'च्या जमान्यात प्रत्येक आई-वडील आपल्या मुला-मुलीचे लग्नं देखील डाम डौलात व्हावे, यासाठी धडपडताना दिसतात. परिणामी अनावश्‍यक खर्चालाही मर्यादा राहत नाही. कुणी कर्ज काढून, तर कुणी प्रॉपर्टी विकून आपल्या पाल्याचे लग्न करतात.

लग्नानंतर मुलगी तिच्या संसाराला लागते; पण आई-वडिलांची लग्नामुळे झालेली आर्थिक ओढाताण भरून निघायला बराच कालावधी जातो. आयुष्यभराची पुंजी मुलीच्या लग्नासाठी खर्च करून कर्जबाजारी होणाऱ्या आई-वडिलांना झाईद शेख यांनी या निमित्ताने एक नवा आदर्श घालून दिला आहे. 

''खूप लोक असे आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही शाही लग्नासाठी प्रयत्न करतात. माझ्या बाबांनी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना आधार वाटेल. यानिमित्ताने समाजात साधी लग्न पद्धत रूढ होत असेल, तर मला त्याचा आनंदच आहे''. 

- जुवेरिया झैद शेख, वधू 

Web Title: Pune man leads the way offers guests only tea at daughters wedding

टॅग्स