पुणे-मुंबई रेल्वे प्रवास रविवारपर्यंत नकाच करू!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक रविवारपर्यंत (ता. ११) बंद राहणार आहे. त्यामुळे सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती व इंद्रायणी आदी गाड्या बंद राहणार आहेत.

पुणे - पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक रविवारपर्यंत (ता. ११) बंद राहणार आहे. त्यामुळे सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती व इंद्रायणी आदी गाड्या बंद राहणार आहेत. त्यानंतर सोमवारपासून (ता. १२) ही वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, लांब पल्ल्याच्या सुमारे ६० गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे.

पुणे-मुंबई मार्गावर ९ ठिकाणी दरड कोसळली आहे. तसेच, मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतही बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबई मार्गावरील वाहतूक बंद ठेवली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या सर्व गाड्या बंद केल्या आहेत. इंदूर, पनवेल पॅसेंजरचाही त्यात समावेश आहे. पुणे-निजामुद्दीन एक्‍स्प्रेस शुक्रवारी (ता. ९) रद्द केली आहे. जयपूर-पुणे आणि पुणे-जयपूर, कोल्हापूर-अहमदाबाद या गाड्या शनिवारी (ता. १०) रद्द केल्या आहेत. 

पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे सोलापूर, कोल्हापूर, मिरज, मनमाड मार्गावरील गाड्यांनाही फटका बसला आहे. अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदललेले आहे. तसेच, काही गाड्या विविध स्थानकांवरून वळविण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती प्रवाशांना ‘एसएमएस’द्वारे दिली जात असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.प्रवाशांचे हाल कायम

पुणे स्थानकावरून अनेक मार्गांवरील गाड्या रद्द झाल्या आहेत, तर काही अन्य मार्गांनी वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्यावरचे हजारो प्रवासी या स्थानकावर थांबले आहेत. बंगळूरकडून पुणे-मुंबईकडे येणाऱ्या गाड्या दौंडवरून वळविण्यात आल्या, तर कोलकताकडून येणाऱ्या गाड्या मनमाडकडून वळविण्यात आल्या. त्यामुळे त्या गाड्यांसाठी पुण्यात थांबलेले प्रवासी संतप्त झाले. त्यांची समजूत घालताना रेल्वे अधिकाऱ्यांची गुरुवारी दमछाक झाली.

सुविधा देण्याचा प्रयत्न
रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलल्याची माहिती प्रवाशांना एसएमएसवर मिळत नव्हती, असे काहींचे म्हणणे होते. काही गाड्या दौंडच्या दिशेने रवाना झाल्या. परंतु, त्या गाडीत गर्दी झाली होती. त्यामुळेही ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे हाल झाले. स्थानकावरील प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune mumbai railway service stop