सहा राज्यांतूनच बासमतीची निर्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

पुणे - देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू- काश्‍मीर या राज्यांतील तांदूळच बासमती तांदूळ म्हणून निर्यात केला जाईल. इतर राज्यांतील बासमती तांदूळ हा "नॉन बासमती' या वर्गवारीतूनच निर्यात करता येईल, असा निर्णय भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने घेतला आहे. तांदूळ निर्यातीत वाढ होत असली तरी आयातदार देशांकडून तो नाकारण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तांदळाचा नवीन हंगाम पुढील पंधरा दिवसांत सुरू होईल. देशांत सर्व भागांत तांदळाचे उत्पादन होत असले तरी बासमती तांदळाच्या उत्पादनात उत्तर भारतातील राज्ये अग्रेसर आहेत. बासमतीची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असते. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वीच हा निर्णय झाल्याने स्थानिक बाजारातील भाव पडू शकतील, अशी माहिती व्यापारी राजेश शहा यांनी दिली. 'तांदळाच्या निर्यातीचा आलेख चढता असला तरी बासमती म्हणून निर्यात केला जाणारा तांदूळ आयातदार देशांकडून नाकारला जातो. यात प्रामुख्याने बासमतीच्या संकरित जाती आणि अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेल्या तांदळाचा समावेश आहे. प्रत व दर्जा उत्तम नसल्यामुळे हा माल नाकारला जातो. यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने हा निर्णय घेतला आहे.''

या संस्थेच्या निर्णयानुसार वरील सहा राज्ये वगळता इतर राज्यांत पिकविला जाणारा तांदूळ बिगरबासमती म्हणून निर्यात करता येईल. यामुळे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, बिहार, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागलॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय या राज्यांतील तांदूळ हा "नॉन बासमती' म्हणून निर्यात करावा लागेल. या निर्णयाचे परिणाम दिसू लागले असून, पारंपरिक बासमती व बिगरबासमतीच्या दरात साधारणतः प्रतिक्विंटल एक हजार रुपये इतकी वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत यंदा तांदूळ निर्यातीत वाढ झाली आहे. बासमतीची निर्यात चार टक्के आणि बिगरबासमतीची निर्यात 11 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. या निर्णयामुळे चांगल्या प्रतीच्या बासमती तांदळाची निर्यात आणि परकीय चलनात वाढ होईल, असा अंदाज आहे.

एप्रिल ते ऑगस्ट : वर्ष - 2016 -2017 आणि 2017 -2018 : (वाढ)
बासमती तांदूळ : 17 लाख 75 हजार 500 टन, आणि 18 लाख 46 हजार टन, 71 हजार टन (4 टक्के )
बिगरबासमती तांदूळ : 29 लाख 67 हजार टन, आणि 32 लाख 86 हजार टन, 3 लाख 19 हजार टन (11 टक्के)
एकूण : 47 लाख 42 हजार 500 टन, आणि 51 लाख 32 हजार टन, 3 लाख 90 हजार टन (8 टक्के)

Web Title: pune news basmati rive import in six state