‘सीए’त राज देशात प्रथम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

डोंबिवली/पुणे - सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षेत डोंबिवलीतील राज शेठ याने देशात पहिला क्रमांक पटकावला.  पुण्यातील निखिल शिंपी हा देशात सोळावा आला आहे. अभिराम भालेराव याला देशात २७ वे आणि गुरुराज लुंकड याला ३० वे स्थान मिळाले.

डोंबिवली/पुणे - सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षेत डोंबिवलीतील राज शेठ याने देशात पहिला क्रमांक पटकावला.  पुण्यातील निखिल शिंपी हा देशात सोळावा आला आहे. अभिराम भालेराव याला देशात २७ वे आणि गुरुराज लुंकड याला ३० वे स्थान मिळाले.

सीएची अंतिम परीक्षा मे २०१७ मध्ये झाली. या परीक्षेत राजने ७८.७५ टक्के गुण मिळवले. त्याचे माध्यमिक शिक्षण डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेत; तर महाविद्यालयीन शिक्षण माटुंगा येथील पोद्दार महाविद्यालयात झाले. राजचे वडील परेश व्यावसायिक; तर आई गृहिणी आहे. सध्या ‘ॲक्‍युचरी’ अभ्यासक्रमाची तयारी करत आहे. यावरच माझा अधिक भर राहील, असे राज शेठ याने ‘सकाळ’ला सांगितले.

या अभ्यासक्रमाच्या कॉमन प्रोफिशिएन्सी परीक्षेत पुण्याची मृण्मयी अवचट देशात प्रथम आली आहे. या वर्षी निकालाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाल्याचे ‘आयसीएआय’च्या पुणे विभागाचे खजिनदार राजेश आगरवाल यांनी सांगितले.

निकालाचे विश्‍लेषण करताना आगरवाल म्हणाले, ‘‘यंदाचा निकाल सुमारे ११.४१ टक्‍क्‍याने वाढला आहे. अभ्यासक्रम कोणताही असो, त्यात स्पर्धा वाढत चालली आहे. विद्यार्थी अभ्यासासाठी कष्ट घेतात. त्यांची बौद्धिक क्षमतादेखील चांगली आहे, त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढली असावी. याशिवाय सनदी लेखापालांना मागणी आहे. त्याला अनुकूल निकाल लागल्याने याचा चांगला परिणाम होईल.’’

निखिल शिंपी हा बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात एमकॉमच्या प्रथम वर्षाला आहे. मिळालेल्या यशाबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, ‘‘अभ्यासात सातत्य ठेवले. परीक्षा जवळ आली असताना चार महिने सुमारे बारा तास अभ्यास केला. त्यामुळे यश मिळाले.’’ 

गुरुराज लुंकड हादेखील निकालाबाबत समाधानी आहे. या वेळी प्रश्‍न कठीण होते; परंतु अधिकाधिक प्रश्‍न सोडविण्यावर भर दिला. परीक्षेच्या काळात विशेष करून अधिक अभ्यास केला.’’

Web Title: pune news Chartered Accountant exam result