पुणे जिल्ह्यात कडकडीत ‘बंद’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, उत्पादनखर्चावर आधारित भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा पुढचा टप्पा म्हणून सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.  

इंदापूर ः शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित ‘इंदापूर बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सलग दोन दिवस इंदापूरचा बाजार बंद राहिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर- बारामती व अकलूज राज्यमार्ग, कळाशी, गंगावळण, वरकुटे बुद्रूक परिसरात शेतकरी संपास सहभागी झाले. 

सासवड  ः पुरंदर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून सासवडच्या घाऊक बाजारात आज ‘बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आठवडे बाजार असूनही किरकोळ भाजी विक्रेत्यांनीही त्यास पाठिंबा दिला. शनिवारी येथे शेतकरी संपासाठी ‘बंद’ पाळला होता. तरीही पुन्हा ‘बंद’ला प्रतिसाद मिळाला.

मंचर : आंबेगाव तालुक्‍यात सोमवारी (ता. ५) पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांनी संप कायम ठेवला आहे. मंचर शहरासह अवसरी खुर्द, पिंपळगाव, एकलहरे, कळंब, चांडोली खुर्द, गावडेवाडी आदी गावातही बंद पाळून संपाला पाठिंबा दिला.

जुन्नर  ः व्यापारी व छोटे-मोठे व्यावसायिक बंदमध्ये सहभागी झाल्याने शंभर टक्‍के कडकडीत बंद पाळला गेला. बाजार समितीच्या आवारात सकाळी परिसरातील विविध गावांचे शेतकरी व कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी दुचाकी रॅली काढून शहरात बंदचे आवाहन केले. 

शिरूर ः शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून शिरूरकरांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे बाहेरगावहून आलेल्यांचे काही प्रमाणात हाल झाले. 

बारामतीत सर्व व्यवहार ठप्प
बारामतीः शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून बारामतीत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. दुपारपर्यंत बंद पाळण्याचा निर्णय झाला होता, मात्र संध्याकाळपर्यंत बहुतेक दुकाने बंद होती.  गेले चार दिवस बाजार समिती व उपबाजार बंद ठेवल्यानंतर शेतकरी आंदोलकांनी सोमवारच्या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन व्यापारी व विक्रेत्यांना केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. 

Web Title: pune news farmer strike farmer band