कोयना परिसरात सापाची नवी प्रजात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

पुणे - सह्याद्री पर्वतरांगांमधील कोयना परिसरात पाण्यात राहणाऱ्या सापाची ‘ॲक्वॉटिक रॅबडॉप्स’ ही नवी प्रजाती आढळून आली आहे. यापूर्वी या सापाला ‘ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक’ असे म्हटले जायचे; परंतु या सापाविषयी संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे निदर्शनास आले. शास्त्रज्ञांच्या अभ्यास गटाने या प्रजातीबाबत केलेल्या संशोधनावर आधारित निबंध ‘झु-टेक्‍सा’ या वैज्ञानिक नियतकालिकात सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स (बंगळूर), नॅचरल हिस्ट्ररी म्युझियम (लंडन), सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्स, भारतीय विज्ञान संस्था (बंगळूर), भारतीय सर्पविज्ञान संस्था (पुणे), भारतीय वन्यजीव संस्था (डेहराडून), केरळ वन संशोधन संस्था व पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने हे संशोधन करण्यात आले आहे. यात नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सचे डॉ. वरद गिरी यांच्यासह डॉ. डेव्हिड गोवर, डॉ. व्ही. दीपक, अशोक कॅप्टन, डॉ. अभिजित दास, संदीप दास, के. पी. राजकुमार  आर. एल. रथीश या संशोधकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

डॉ. गिरी म्हणाले, ‘‘या प्रजातीचा साप सर्वप्रथम कोयना परिसरात आढळून आला. सापाला ‘ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक’ म्हटले जायचे; परंतु या सापाचा गुणसूत्र, रूपात्मक आणि जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध अभ्यास केला. त्यावरून ही प्रजाती वेगळी असल्याचे सिद्ध झाले आहे. हा पाणसर्प असल्यामुळे त्याला ‘ॲक्वॉटिक रॅबडॉप्स’ हे नाव दिले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोयना, कास पठार, आंबोली यासह इतर भागांमध्ये हा साप आढळतो. त्याशिवाय गोवा राज्यासह बेळगावतही तो आढळतो.

या सापाचे वैशिष्ट्य 
 ॲनाकोंडा या सापाच्या रंगाशी साधर्म्य
 तपकिरी रंगाचा आणि त्यावर काळे ठिपके
 पोटावर गडद तपकिरी रंगाची पट्टी
 लांबी साधारण तीन फूट
 देशात जवळपास तीनशेहून अधिक प्रजातींचे साप आहेत.
 गोड्या पाण्यातील पाण दिवड, ऑलिव्ह किल बॅक, ॲक्वॉटिक रॅबडॉप्स हे साप
 खाऱ्या पाण्यात जवळपास पन्नासहून अधिक प्रजातींचे साप आढळतात.

Web Title: pune news koyna snake