राज्यात पुन्हा गारठा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पुणे - राज्यात हवामान कोरडे असल्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढत आहे. परिणामी, राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका पुन्हा जाणवत आहे. मराठवाड्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय, तर विदर्भात काही भागात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. राज्यात अनेक शहरांमध्ये बुधवारी किमान तापमानात तीन ते सहा अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले. जळगावमध्ये 9 अंश सेल्सिअस अशा सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली.

गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मराठवाड्यासह विदर्भातही तापमानात घट झाल्याचे निदर्शनास आले. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. जळगाव, सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथे किमान तापमानात तब्बल तीन ते सहा अंश सेल्सिअसने घट झाल्याचे बुधवारी दिसून आले.

पुण्यासह नाशिक, उस्मानाबाद, ब्रह्मपुरी येथे 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. पुण्यात 9.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. रविवारपर्यंत (ता. 4) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Web Title: pune news maharashtra news cold increase