मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

राज्यातील पर्जन्यवृष्टी
पुणे - धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने पातळीत वाढ
नागपूर : चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्ध्यात पाऊस
अकोला : पावसाने ओढ दिल्याने खत शिल्लक
वाशीम : जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस
नांदेड : जिल्ह्यात पावसाला सुरवात
नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणामध्ये संततधार
धुळे : हलका ते मध्यम पाऊस, दुबारचे संकट टळले
कोल्हापूर : धरण क्षेत्रात पावसाची संततधार
कोकण - मालवण, पेण, दापोलीत जोरदार पाऊस

पुणे  - कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सोमवारी (ता. २६) सायंकाळी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ओढे, नदी, नाले वाहू लागले असून धरणक्षेत्रातही जोर कायम होता. कोकणातील पेण, हर्णे, खेड, दापोली, चिपळून, रोहा, मध्य महाराष्ट्रातील लोणावळा, महाबळेश्वर, पन्हाळा येथे अतिवृष्टी झाली. मंगळवारी (ता. २७) पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नागपूर, सातारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

उद्या (ता. २८) कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी जोरदार तसेच विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. गेल्या आठवड्यात माॅॅन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. येत्या शनिवार(ता. १) पर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातील सेनगाव, किनवट, बिल्लोली, देगलूर, सिल्लोड, विदर्भातील खारांघा, सेलू, कळमेश्वर, भामरागड, मुलचेरा, राळेगण, वर्धा येथे मध्यम ते जोरदार पाऊस झाला. 

मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईला पाणीपुरवठा विहार, तुलसी, तानसा, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या तलावाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. 

Web Title: pune news maharashtra rain