शिळ्या दुधाचाच काटकसरीने वापर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - शेतकऱ्यांच्या संपामुळे रविवारपर्यंत जिल्ह्यात केवळ 28.96 टक्के इतकेच दूध संकलन होऊ शकले. यामुळे जिल्ह्याला 9 कोटी एक लाख रुपयांचा, तर विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत मिळून सुमारे 34 कोटी 70 लाख रुपयांचा आर्थिक फटका दूध व्यावसायिकांना बसला आहे. परिणामी, शिल्लक शिळे दूध खरेदी करून त्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. अमृततुल्य व्यावसायिक आणि नागरिक दुधाचा साठा करू लागले असून, सोमवारच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर उद्या (मंगळवारी) शहरात दुधाचा तुटवडा भासेल. 

पुणे - शेतकऱ्यांच्या संपामुळे रविवारपर्यंत जिल्ह्यात केवळ 28.96 टक्के इतकेच दूध संकलन होऊ शकले. यामुळे जिल्ह्याला 9 कोटी एक लाख रुपयांचा, तर विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत मिळून सुमारे 34 कोटी 70 लाख रुपयांचा आर्थिक फटका दूध व्यावसायिकांना बसला आहे. परिणामी, शिल्लक शिळे दूध खरेदी करून त्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. अमृततुल्य व्यावसायिक आणि नागरिक दुधाचा साठा करू लागले असून, सोमवारच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर उद्या (मंगळवारी) शहरात दुधाचा तुटवडा भासेल. 

प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार सोमवारी पुणे जिल्ह्यातील सोनई, अमूल, पराग, डायनॅमिक, शुभी या दूध डेअऱ्यांनी संकलन बंद ठेवले. सातारा जिल्ह्यातील गोविंद दूध डेअरीने दिवसभर संकलन बंद ठेवले होते, तर सोलापूर जिल्ह्यात सोलापूर संघ, शिवप्रसाद, शिवामृत या संघांनीही संकलन बंद ठेवले होते. सांगली जिल्ह्यातील चितळे दूध डेअरी, पालीवाल डेअरीनेही सकाळचे संकलन बंद ठेवले. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळ, स्वाभिमानी, हुमान येळगुड या डेअऱ्यांनीदेखील संकलन बंद ठेवले. या प्रमुख दूध संघ आणि डेअऱ्यांनी बंदला दिलेल्या पाठिंब्यामुळे फारसे दूधसंकलन होऊ शकलेले नाही. 

शहरात सोमवारी दूध मिळत होते. अमृततुल्य व्यावसायिकांकडेही दुधाची कमतरता नव्हती. जीवनावश्‍यक असले तरीही दूध नाशवंत आहे. ते दोन-तीन दिवस फ्रीजमध्ये राहू शकते. त्यामुळेच संप मिटण्याची चिन्हे अद्यापही स्पष्ट दिसत नसल्याने, ग्राहकही अधिकच्या एक ते दीड लिटर दुधाचा साठा करून ठेवत आहेत. गोकूळ दूध डेअरीद्वारे रोज दहा लाख लिटर दुधाचे संकलन होते. परंतु महाराष्ट्र बंदमुळे त्यांनी संकलन बंद ठेवले. त्याचा फटका उद्या (ता. 6) ग्राहकांना नक्कीच बसेल. 
चितळे दूध डेअरीचे प्रवक्ते गिरीश चितळे म्हणाले, ""पुण्यासाठी साडेचार लाख लिटर दुधाची व्यवस्था केली आहे. गाड्या आदल्या दिवशीच पाठविल्यामुळे पुणेकरांना मंगळवारी दूध मिळेल. मात्र महाराष्ट्र बंदमुळे सकाळी संकलन बंद ठेवले होते.'' पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, ""बंदमुळे 35 ते चाळीस टक्के संकलन झाले. मात्र डेअरीतील दुधाच्या साठ्यानुसार मंगळवारी पुणेकरांसाठी एक लाख लिटर दुधाची व्यवस्था होईल.'' 

संपामुळे भाजी, दूध महागले आहे. पण भाजी, दूध ही दैनंदिन गरज आहे. मी रोज एक लिटर दूध घेते. पण पिशवीबंद दूध शिळे असते. तरीही ते घ्यावे लागते. ताजे दूध मिळत नाही. 
- प्रतिभा चिमलगीकर, गृहिणी 

संप असल्याने काटकसरीने दूध वापरावे लागते. अचानक कोणी घरी आले तर चहासाठी दूध पुरवून पुरवून वापरावे लागते. 
- लता राजगुरू, निवृत्त शिक्षिका 

दररोज एक लिटर दूध लागते. पण चार दिवसांपासून दररोज दीड लिटर आणते. संप असाच सुरू राहिल्यास पावडरचे दूध प्यायची वेळ येईल. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांकरिता दुधाची सोय कशी करणार? 
- मनीषा पिंगळे, गृहिणी 

आमच्याकडे रतिबाचे दूध येते. पण पाच दिवसांपासून गवळी आलाच नाही. त्यामुळे पिशवीबंद दूध खरेदी करत आहोत. परिणामी कोणत्याही उत्पादक कंपन्यांचे दूध खरेदी करावे लागत आहे. फ्रिज असला तरीही साठा करून शिळे दूध किती दिवस वापरायचे. 
- स्वाती गिजरे, नोकरदार. 

प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार 
1 ते 4 जूनपर्यंतचे आर्थिक नुकसान (जिल्हानिहाय) 
पुणे 
- सहकारी - एक कोटी 54 लाख 
- खासगी - 7 कोटी 47 लाख 
- एकूण - 9 कोटी एक लाख 
----------------------- 
सांगली 
- सहकारी - एक कोटी 38 लाख. 
- खासगी - 65 लाख 
- एकूण - दोन कोटी तीन लाख. 
------------------------ 
सातारा 
- सहकारी - 73 लाख. 
- खासगी - पाच कोटी 90 लाख 
-एकूण - सहा कोटी 63 लाख. 
------------------------- 
सोलापूर 
- सहकारी - एक कोटी 83 लाख 
- खासगी - दहा कोटी 95 लाख 
- एकूण - 12 कोटी 78 लाख. 
------------------------- 
कोल्हापूर 
- सहकार - तीन कोटी 82 लाख. 
- खासगी - 43 लाख 
-एकूण - चार कोटी 25 लाख 

Web Title: pune news milk farmer strike