पुढील दोन दिवसांत मॉन्सून मध्य महाराष्ट्रात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

पुणे शहर आणि परिसरात ढगांच्या गडगटासह पावसाचा अंदाज

पुणे शहर आणि परिसरात ढगांच्या गडगटासह पावसाचा अंदाज
पुणे - कोकणात दाखल झालेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. येत्या चोवीस तासांमध्ये कोकणात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. पुणे शहर आणि परिसरातील काही भागातही ढगांच्या गडगटासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

मॉन्सून वेगाने कोकण व्यापत आहे. तळकोकणमध्ये सकाळपासून पावसाच्या दमदार सरी पडत आहेत. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने पुढील दोन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रापर्यंत मॉन्सून पोचेल, असा विश्‍वास हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

उत्तर राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच, पश्‍चिम राजस्थान आणि पाकिस्तानच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोकणात मॉन्सून पोचला असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल. तसेच, मध्य महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर मॉन्सून या भागात दाखल होईल. मराठवाडा आणि विदर्भातही काही भागात पाऊस हजेरी लावत असून, पुढील दोन दिवसात याचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे.

तापमान घटले

ढगाळ हवामानामुळे विदर्भ व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात उल्लेखनीय घट झाली. ब्रह्मपुरी येथे शुक्रवारी (ता. 9) कमाल तापमान 41.2 नोंदले गेले. कोकण, गोव्याच्या काही भागांत व मराठवाड्याच्या तसेच राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.

पुण्यात ढगाळ हवामान
पुणे शहर आणि परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सातारा रस्त्यावरील कात्रज, धनकवडी, आंबेगाव, कोंढवा या भागात दुपारी पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर येथेही पावसाने हजेरी लावली. संध्याकाळनंतर मध्य वस्तीतील पेठांमध्ये तुरळक सरी पडल्या.

Web Title: pune news monsoon in maharashtra next two days