मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मॉन्सूनचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

जूनमध्ये अनेक जिल्ह्यांत सरासरीच्या साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस

जूनमध्ये अनेक जिल्ह्यांत सरासरीच्या साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस

पुणे: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला यंदाच्या पावसाने पहिल्या महिन्यात दिलासा दिला असून, विदर्भातील काही जिल्ह्यांनी अद्यापही सरासरी गाठलेली नाही. पुण्यासह नगर, सोलापूर, उस्मानाबाद आणि पालघर जिल्ह्यांमध्ये तेथील सरासरीच्या 60 टक्‍क्‍यांहून अधिक पावसाची नोंद हवामान खात्यात झाली आहे.
देशात 30 मे रोजी मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी 8 जूनपर्यंत वाट पहावी लागली. सुरवातीला कोकणाला पावसाने झोडपले. त्यानंतर त्याचा मध्य महाराष्ट्रात संथ गतीने प्रवास सुरू झाला. संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी या वर्षी मॉन्सूनला तेरा दिवस लागले. या दरम्यान मॉन्सूनने मध्य महाराष्ट्रात बरेच दिवस विश्रांती घेतली होती. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. मात्र, तो भारतीय उपखंडाकडे सरकण्याऐवजी वातावरणाच्या प्रभावामुळे ओमानच्या दिशेने गेला. त्यामुळे महाराष्ट्रात दाखल झालेल्या मॉन्सूनची प्रगती होत नव्हती. या पार्श्‍वभूमिवर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर या दुष्काळी पट्ट्यात त्याचा जोर अधिक होता. त्यामुळे 1 जूनपासून राज्यात पडलेल्या पावसाचे विश्‍लेषण करताना मराठवाड्यात पावसाने सरासरी गाठल्याचे दिसते, असे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

सर्वसाधारण पावसाचे जिल्हे
कोकणातील मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे दमदार पाऊस पडला. या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली. सातारा येथे सरासरी पावसाची नोंद झाली. नंदूरबार, धुळे, जालना, औरंगाबाद, परभणी, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर येथेही पावसाने हजेरी लावली.

पावसाची सरासरी ओलांडणारे जिल्हे
पुणे, पालघर, नगर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तेथील सरासरीपेक्षा 60 टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस पडला. तसेच ठाणे, नाशिक, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, बुलडाणा आणि वाशीम येथे सरासरीच्या तुलनेत 20 ते 59 टक्के पाऊस पडला.

सरासरीपेक्षा कमी पावसाचे जिल्हे
दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया येथे या जिल्ह्यांच्या सरासरीपेक्षा 20 ते 50 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात या वर्षी मॉन्सून उशिरा पोचला. त्यामुळे तेथे अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

हवामान विभागनिहाय पाऊस
हवामान विभाग ............. सरासरी पाऊस ........... प्रत्यक्ष पाऊस ......... सरासरीच्या तुलनेत टक्केवारी
कोकण ...................... 738.5 मि. मी. ..... 869.2 मि. मी. ..... 18
मध्य महाराष्ट्र .............. 151.9 मि. मी. ...... 198.6 मि. मी. ..... 31
मराठवाडा .................. 148.9 मि. मी. ..... 181.9 मि. मी. ...... 22
विदर्भ ....................... 177.2 मि. मी. ....... 160.3 ................... -10

(स्त्रोत ः भारतीय हवामान विभाग)

Web Title: pune news rain in maharashtra and marathwada