'लाटेवर निवडून आलेल्यांना मतदारांची जाणीव नाही'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पुणे - ""समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती असावी लागते, तरच प्रश्‍न निकाली निघू शकतात; पण दिल्लीतील लाटेवर निवडून आलेल्यांना मतदारांच्या समस्यांची जाणीव नाही,'' अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सरकारवर टीका केली. राजकीय व्यवस्थेत लोकशाहीशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले. 

पुणे - ""समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती असावी लागते, तरच प्रश्‍न निकाली निघू शकतात; पण दिल्लीतील लाटेवर निवडून आलेल्यांना मतदारांच्या समस्यांची जाणीव नाही,'' अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सरकारवर टीका केली. राजकीय व्यवस्थेत लोकशाहीशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले. 

रामकृष्णहरी कृषी प्रतिष्ठानचा "प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार' संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते निंबाळकर यांना प्रदान करण्यात आला. आमदार नीलम गोऱ्हे, बाबासाहेब तापकीर, संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन थोरात, हरीश चिकणे, मीरा चिकणे उपस्थित होत्या. 

रामराजे म्हणाले, ""राजकीय लोक भ्रष्टच असतात, असे सर्वांना वाटते. मग अशा लोकांना निवडून देणारे आपण कोण? याचाही विचार जनतेने केला पाहिजे. आमच्या नाड्या तुमच्या हातात असतात, याचे विस्मरण झाले आहे. जात, पैसा पाहून मतदान केले जाते. म्हणून चुकीची माणसे निवडून येतात. याला जबाबदार मतदारच आहेत. हे चित्र बदलले पाहिजे.'' हे मी स्पष्टपणे बोलू शकतो. कारण मला आता मते मागायची नाहीत, असेही त्यांनी आपल्या खास शैलीत सांगितले. 

"रामराजे हा आपला माणूस आहे,' असे उद्धव ठाकरे यांनी एकदा सांगितले होते. त्यांनी असे का सांगितले, याचा राजकीय अर्थ कळला नाही, असे सांगून गोऱ्हे म्हणाल्या, ""ठाकरे यांच्या या निर्णयामुळेच रामराजे बिनविरोध सभापती झाले.'' 

मोरे म्हणाले, ""राजकीय पक्षात काही झाकली माणके असतात, तरीही त्यांचा प्रकाश पडतच असतो. त्यातील रामराजे हे एक आहेत.'' संजय बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले. 

साताऱ्यातील नेत्यांवर कोटी  
""जीवनगौरव पुरस्कार' हा निवृत्त व्यक्तीला मिळतो; पण मी निवृत्त होणार नाही आणि मला कोणी निवृत्त करणारही नाही. हा पुरस्कार स्वीकारला. कारण तो मित्राच्या नावाचा आहे; पण निवृत्त व्यक्तीला दिला जाणारा "जीवनगौरव पुरस्कार' मला मिळाल्याचे पाहून साताऱ्यातील काही लोकांना बरे वाटले असेल,'' अशी साताऱ्यातील नेत्यांवर निंबाळकर यांनी कोटी केली. त्यामुळे सभागृहात हास्याची कारंजी उडाली. राजकारणात पुढे आणखी संधी मिळाली, तर पाण्याच्या प्रश्‍नावर काम करेन, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: pune news Ramraje Naik-Nimbalkar