मुलांमधील चित्रकाराला वाट करून द्या - ल. म. कडू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

पुणे - 'चित्रकलेतून प्रत्येक मुल व्यक्त होत असते. पण, मुलांमध्ये दडलेला अवलिया चित्रकार ओळखण्यात पालक कमी पडतात. त्यांच्यातील चित्रकाराला ते समजून घेत नाहीत. कमतरता असेल तिथे कल्पकता असते हे ओळखून पालकांनी मुलांमधील चित्रकाराला त्यांनी वाट द्यायला हवी आणि त्यांच्यातील चित्रकार घडवायला मदत करावी,'' असे आवाहन चित्रकार आणि बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ल. म. कडू यांनी मंगळवारी पालकांना केले. 

पुणे - 'चित्रकलेतून प्रत्येक मुल व्यक्त होत असते. पण, मुलांमध्ये दडलेला अवलिया चित्रकार ओळखण्यात पालक कमी पडतात. त्यांच्यातील चित्रकाराला ते समजून घेत नाहीत. कमतरता असेल तिथे कल्पकता असते हे ओळखून पालकांनी मुलांमधील चित्रकाराला त्यांनी वाट द्यायला हवी आणि त्यांच्यातील चित्रकार घडवायला मदत करावी,'' असे आवाहन चित्रकार आणि बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ल. म. कडू यांनी मंगळवारी पालकांना केले. 

पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी "सकाळ चित्रकला स्पर्धा - 2017' च्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. स्पर्धेत राज्य पातळीवर यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कडू आणि "सकाळ'च्या संचालिका मृणाल पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी कडू यांनी मुलांशी दिलखुलास गप्पा मारत चित्रांचे विलोभनीय जगही त्यांच्यासमोर उलगडले. 

'सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले आणि "ग्लोबल कंझ्युमर प्रॉडक्‍ट्‌स्‌'चे एरिया सेल्स मॅनेजर शैलेश कोंडे या वेळी उपस्थित होते. 

यानिमित्ताने स्पर्धेतील 36 उत्कृष्ट चित्रांचा समावेश असलेल्या "इनोसंट एक्‍सप्रेशन्स' या दिनदर्शिकेचे प्रकाशनही झाले. 

कडू म्हणाले, 'पूर्वी चित्रांसाठी इतकी साधने उपलब्ध नव्हती. पण, आज चित्रांसाठी मोठे दालन उघडे झाले आहे. मुलांनी वास्तववादी चित्रे रेखाटावी हा आग्रह दूर करून पालकांनी त्यांच्या कल्पनेतील चित्रकाराला आकार द्यावा. त्यांच्यावर दबाव टाकण्यापेक्षा त्यांच्यातील कलाकाराला वाट करून द्यावी. साधनांची कमी असली तरी आपण चित्र काढू शकतो हेही त्यांना पटवून द्यावे.'' 

अरणकल्ले म्हणाले, 'गेल्या 32 वर्षांपासून "सकाळ' ही स्पर्धा आयोजित करत आहे. दरवर्षी याला लाखो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. यातून एक सांस्कृतिक पिढी तयार करण्यासह मुलांच्या कलेला वावही मिळत आहे. यावर्षी सात लाख विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमधील बालचित्रकाराला व्यासपीठ मिळत असून, यंदा महाविद्यालयीन तरुणांनीही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चित्र म्हणजे संवादाचे साधन. चित्रांची ही दुनिया तशी जुनी असून, चित्रांचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे. चित्रांविषयीचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा. मुलांच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्न हे चित्रांतून उलगडते. ते पालकांनी समजून घेतले पाहिजे.'' 

परीक्षक समितीमधील मालती आगटे, मिलिंद फडके, प्रीती गोटखिंडीकर आणि राहुल देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या निवडक शिक्षण संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनाही गौरविण्यात आले. यात "कॅम्प एज्युकेशन सोसायटी'चे अध्यक्ष वालचंद संचेती, लक्ष्मणराव आपटे प्रशालेचे संचालक अभिजित आपटे, इंडियन एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रदीप नाईक, एमआयटी स्कूलचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. श्री. श्रीधर, कर्वे शिक्षण संस्थेचे एन. डी. पाटील, जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा जोग, खंडोजी-बंडोजी चव्हाण शाळेचे संचालक काका चव्हाण, विद्यांचल स्कूलचे संचालक अशोक मुरकुटे, पेरिविंकल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, एम. टी. बालवडकर शाळेचे अध्यक्ष सागर बालवडकर, वंडरलॅंड इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा नलिनी मोरे, भावे स्कूलच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गायकवाड आणि एसएनबीपी स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर तेलोरे यांचा समावेश होता. 

या स्पर्धेचे श्री चैतन्य टेक्‍नो स्कूल आणि जिंगल टुन्स हे असोसिएट प्रायोजक, आयकेअर पार्टनर गांगर आयनेशन, एन्व्हायर्मेंट पार्टनर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि कॉर्पोरेट पार्टनर इंडियन ऑइल होते. 

"सकाळ चित्रकला स्पर्धे'त यश मिळविणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन टिळक स्मारक मंदिर येथे भरविण्यात आले होते. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध विषयांवरील ही चित्रे रसिकांना मनापासून भावली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत रसिकांनी त्यांच्या चित्रांना दिलखुलास दादही दिली. सकाळपासून प्रदर्शन पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. 

कार्यक्रमात पारितोषिके देण्यात आलेले विद्यार्थी - 
सर्वसामान्य गटातील विजेते 

- "अ' गट - प्रथम - आदर्शा रमण लोहार (साधना विद्यालय), द्वितीय - अनुजा गोरवाडे (मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, शिवाजीनगर), तृतीय - आर्या मेश्राम (साउथ वेस्ट कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल) 

- "ब' गट - प्रथम - श्रुती वीरेंद्र गायकवाड (विद्या प्रतिष्ठानचे विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर), द्वितीय - हर्षल देशमुख (अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक शाळा, सातारा), तृतीय - चैतन्य रतन वाघ (के. डी. भालेराव इंग्लिश मीडियम स्कूल, सटाणा) 

- "क' गट - प्रथम - कुणाल धनाजी खैरनार (श्री महालक्ष्मी विद्यालय, जुन्नर), स्वराज प्रशांत शेकटकर (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, नगर), तृतीय - धृती नायक (डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल) 

- "ड' गट - प्रथम - आदित्य संतोष गोरे (रु. दा. मालपाणी विद्यालय, संगमनेर), द्वितीय - आर्यन रमण लोहार (साधना हायस्कूल, कोल्हापूर), तृतीय - प्रणाली मनाली विसावे (पंकज विद्यालय, चोपडा) 

महाविद्यालयातील विजेते विद्यार्थी 
पुणे शहर विभाग (क्रिएटिव्ह डिझाईन) 

- प्रथम - सूरज विनोद होन्नावरकर (एमसीई सोसायटीचे स्कूल ऑफ आर्टस, आझम कॅम्पस) - द्वितीय - श्रीकृष्ण वाघेश्‍वरी अभिनव कला महाविद्यालय, टिळक रस्ता) - तृतीय - कुंदन टाकळे - (अभिनव कला महाविद्यालय, टिळक रस्ता) 

पुणे शहर विभाग (कम्युनिकेशन डिझाईन) 
- प्रथम - आकाश जाधव (अभिनव कला महाविद्यालय, टिळक रस्ता), द्वितीय - गायत्री गावडे (अभिनव कला महाविद्यालय, टिळक रस्ता) , तृतीय - पूर्वा कलाप (अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, पुणे) 

विशेष पारितोषिक (मूकबधिर विद्यार्थी) 
- उत्तेजनार्थ - प्रशांत कल्याणकर (अभिनव कला महाविद्यालय, टिळक रस्ता) 

पिंपरी-चिंचवड विभाग विजेते 
- प्रथम - श्रद्धा गोलांडे (एस. बी. पाटील कॉलेज ऑफ अप्लाईड आर्टस), द्वितीय - प्रतीक शेलार (नॅशनल कॉलेज ऑफ फाईन आर्टस फाउंडेशन) - तृतीय - राहुल सावंत (शकुंतला मुठे कॉलेज ऑफ आर्टस) 

टिळक स्मारक मंदिर - पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी "सकाळ चित्रकला स्पर्धा - 2017' मध्ये विजेत्या विद्यार्थ्यांसह (मध्यभागी) ल. म. कडू आणि मृणाल पवार.

Web Title: pune news sakal drawing competition 2017 result